अध्यक्षांंच्या आवाहनाला प्रशासनाकडूनच ‘आव्हान’
By admin | Published: November 27, 2015 11:51 PM2015-11-27T23:51:07+5:302015-11-27T23:51:34+5:30
नोकर भरतीतील आर्थिक आमिषाची तक्रार
नाशिक : जिल्हा परिषदेत ७२ पदांसाठी नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यात येत असून, काही उमेदवारांना नोकरीच्या आमिषाने आर्थिक पिळवणुकीच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी नोकरभरती पारदर्शक व नियमानुसार होणार असल्याचे आवाहन करीत नोकरीसाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
नोकरभरतीत ठरावीक पदाधिकारी व सदस्यांना अमुक जागांचा ‘कोटा’ ठरविण्यात आला असून, त्यानुसार ही नोकरभरती होत आहे. त्यासाठी एकेका जागेसाठी ‘लाख मोलाची’ बोली लावली जात असून, याबाबत काही उमेदवारांकडून आर्थिक मागणीही करण्यात आल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी जिल्हा परिषदेची नोकरभरती ही शासन नियम-निकषानुसार व गुणवत्तेवरच होणार असून, त्याबाबत उमेदवारांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले
होते.
उपराज्यमंत्र्यांचा दर्जा असलेल्या दस्तुरखुद्द अध्यक्षांनीच असे आवाहन करण्याची वेळ आल्याने नोकरभरतीत काळेबेरे होत असल्याच्या चर्चेला एकप्रकारे दुजोरा मिळालेला असताना आणि अशा प्रकारे जर कोणी आर्थिक निकषाच्या बळावर नोकरीचे आमिष दाखवित असेल तर या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेत त्याबाबत किमान प्राथमिक पातळीवर तरी चौकशी करून अहवाल मागविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रशासनाने नोकरभरती ही शासन नियमानुसार व पारदर्शकपणे होत असून त्यात कोणताही गैरप्रकार झालेला नाही आणि त्याबाबत कोणीही तक्रार केलेली नसल्याचे सांगत एकप्रकारे अध्यक्षांनी केलेल्या आवाहनाला केराची टोपली दाखविल्याची जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा आहे. (प्रतिनिधी)