अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आव्हान
By admin | Published: February 24, 2016 11:51 PM2016-02-24T23:51:38+5:302016-02-24T23:52:32+5:30
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न : नियम-निकषातही येणार अडचणी
नाशिक : महापालिकेने न्यायालयाच्या आणि शासनाच्या निर्देशानुसार शहरातील सन २००९ पूर्वीच्या आणि नंतरच्या अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर खुली केली असून पुरातन/प्राचीन धार्मिक स्थळे वगळता अन्य बांधकामांबाबत नियमितीकरण, स्थलांतरण आणि निष्कासन या तीन पातळ्यांवर कार्यवाही करताना महापालिकेची मोठी कसोटी लागणार आहे. येत्या दीड वर्षांत अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी मोहीम राबविताना प्रामुख्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असतानाच नियम-निकष तपासणीतही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे मोठे आव्हान मनपासमोर उभे ठाकले आहे.
न्यायालयाचे निर्देश आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने पोलीस विभागाच्या साहाय्याने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले असता सन २००९ पूर्वीची १०६४, तर सन २००९ नंतरची २८४ धार्मिक स्थळे आढळून आली आहेत. महापालिकेने सदर धार्मिक स्थळांची यादी आपल्या संकेतस्थळावर टाकत संबंधितांकडून सूचना व पुरावे मागितले आहेत. धार्मिक स्थळांची यादी खुली करताना बव्हंशी बांधकामे ही महापालिकेच्या खुल्या जागेत करण्यात आलेली आहेत. धार्मिक स्थळांची मालकी अथवा जागामालक याबाबतही सर्वेक्षणात माहिती संकलित करण्यात आलेली आहे. परंतु, असंख्य धार्मिक स्थळांची मालकी सांगण्यास कुणीही पुढे आलेले नाही. अनेक धार्मिक स्थळांचे बांधकाम नेमके कोणत्या वर्षी झाले अथवा त्याचे नूतनीकरण कधी झाले याचीही माहिती सर्वेक्षणात उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे सन २००९ नंतरचा निकष लावताना महापालिकेची मोठी कसरत होणार आहे.