शिवसेनेपुढे आव्हान
By admin | Published: February 16, 2017 12:11 AM2017-02-16T00:11:35+5:302017-02-16T00:11:44+5:30
चुरस : गटात चौरंगी लक्षवेधी लढत; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
महेश गुजराथी चांदवड
तालुक्यातील वडाळीभोई जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती महिला आरक्षित झाल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांचे तोंडचे पाणी पळाले होते. त्यांनी दुधाची तहान ताकावर भागवत गणात उभे राहावे लागले होते. योगायोगाने वडाळीभोई गण सर्वसाधारण आहे व सभापतिपदाचे आरक्षणही सर्वसाधारण निघाल्याने गटापेक्षा गणात चुरशीचा सामना होत आहे. येथे दिग्गज नेतेही उभे ठाकले आहेत.
वडाळीभोई गट तसा परंपरागत शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गत दोन निवडणुकीपासून येथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतात. यापूर्वी बंडू गांगुर्डे, कारभारी अहेर यांनी गटाचे नेतृत्व केले आहे. यावेळी पहिल्यापासूनच राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती बाळासाहेब धाकराव, भाजपाच्या अर्चना अनिल जाधव, शिवसेनेच्या कविता भाऊसाहेब धाकराव यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अलका महेंद्र गवारे यांनी गटात तयारी सुरु केली आहे. गटात चौरंगी सामना होईल असे चित्र असले तरी अपक्ष उमेदवार रुपाबाई कैलास केदारे व अनुसयाबाई हिरामण बोढारे यासुद्धा काही कमी नाही असे दिसते. केदारे यांना भाजपाचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा असल्याने त्यांनी गटात फॉर्म भरला मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. वडाळीभोई गटात प्रत्येक निवडणुकीत रस्ते, पाणी, शेतीचा पाणीप्रश्न, बंधारे, एस.टी. बस आदि प्रश्न चर्चिले जातात. निवडणुका आल्या की याच प्रश्नांवर बोलले जाते. मात्र प्रश्न काही सुटत नाही अशी परिस्थिती प्रत्येकवेळी होते. यावेळी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची युती झाल्याने येथील चित्र वेगळे दिसू शकते. मात्र भाजपा व शिवसेना यांची युती तुटल्याने येथे तोडा झोडा ही नीती दिसून येईल अशी चर्चा आहे. तरी नोटाबंदी, चेकचे पैसे न मिळणे, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, शेती समस्या आदि मुद्दे जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येतील, असे चित्र आहे.