स्वच्छ सर्वेक्षणात क्रमांक येण्यासाठी नाशिक महापालिकेची नागरी प्रतिसादाकरीता धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:44 PM2017-12-12T15:44:28+5:302017-12-12T15:45:38+5:30
स्वच्छ सर्वेक्षण : ३३ हजार नागरिक स्वच्छता अॅपशी लिंक
नाशिक - पुढील महिन्यात केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणास सुरूवात होणार असल्याने महापालिकेने स्वच्छतेसंदर्भात शहरात पुरविलेल्या सोयीसुविधांबाबत नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळावा यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्यासाठी महापालिकेने स्वच्छता अॅप तयार केले असून स्मार्ट नाशिक अॅपशी लिंकअप केलेल्या या अॅपशी आतापर्यंत शहरातील ३३ हजार नागरिक लिंक झाले आहेत. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कामगिरी उंचावण्याची अपेक्षा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी व्यक्त केली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणास ४ जानेवारीपासून सुरुवात होणार असून त्यासाठी केंद्रीय पथक येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सर्व खातेप्रमुखांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी सांगितले, महापालिकेने तयार केलेले स्वच्छता अॅप हे स्मार्ट नाशिकशी लिंक केलेले आहे. आतापर्यंत ३३ हजार नागरिक स्वच्छता अॅपशी लिंक झाले असून त्यात आणखी भर पडणार आहे. पूर्वी २७३ वा रॅँक होता, आता तो ७४ च्या आसपास आलेला आहे. नागरिकांनी या स्वच्छता अॅपवर आपला प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहनही आयुक्तांनी केले. याशिवाय, स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत महापालिकेने खतप्रकल्पांवर राबविलेल्या उपक्रमांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. महापालिकेने घंटागाड्यांना लावलेली जीपीएस यंत्रणा, खतप्रकल्पावर सीसीटीव्ही यंत्रणा, आॅटो वे ब्रिज आदी उपक्रम राबविलेले आहेत. खतप्रकल्पावर तयार होणा-या खतांची वितरण व्यवस्थाही पूर्णपणे होत आहे. आरसीएफच्या माध्यमातून खतांची वितरण व्यवस्था सुरू आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शहरात ७२४६ वैयक्तिक शौचालयांची उभारणी केलेली आहे तर २० कम्युनिटी शौचालय उभारलेले आहेत. यंदा स्पर्धक शहरांची संख्या मोठी असली तरी नाशिकची कामगिरी गेल्या वर्षाच्या तुलनेत निश्चितच उंचावलेली असेल, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.
आज मुंबईत बैठक
स्वच्छ सर्वेक्षण पुढील महिन्यात सुरू होणार असल्याने त्याबाबत आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय बैठक बुधवारी (दि.१३) मुंबईत होणार आहे. या बैठकीत नाशिक महापालिकेमार्फत स्वच्छताविषयक राबविलेल्या उपक्रमांची तसेच सोयीसुविधांच्या माहितीचे सादरीकरण केले जाणार आहे.