नात्यागोत्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत बंडखोरांचे आव्हान
By admin | Published: February 12, 2017 10:58 PM2017-02-12T22:58:30+5:302017-02-12T22:59:12+5:30
पक्षांतराने बदलले राजकारणाचे गणित
गोकुळ सोनवणे सातपूर
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये नात्यागोत्यांची आणि अस्तित्वाची लढाई पहावयास मिळत आहे. त्यात पक्षांनी आश्वासन देऊन उमेदवारी न मिळाल्याने काही उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोरांबरोबरच प्रतिस्पर्धीचा सामना पक्षाच्या उमेदवारांना करावा लागत आहे.
महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत नवीन आरक्षणानुसार सातपूर विभागातील प्रभाग क्र मांक १० मध्ये पिंपळगाव बहुला, जाधव संकुल, संभाजीनगर, सावरकरनगर, विश्वासनगर, वास्तुनगर, श्रीकृष्णनगर, समतानगर, अशोकनगर, विवेकानंदनगर, राज्य कर्मचारी वसाहत आदि भागांचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षांपासून मनसेचे नगरसेवक शशिकांत जाधव हे या भागाचे नेतृत्व करीत आहेत. मनसेला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपाचा रस्ता धरला आणि उमेदवारी गळ्यात पडली.
(अ) ओबीसी महिला गटातून शिवसेनेच्या उमेदवार डॉ. वृषाली सोनवणे यांना मनसेच्या फरिदा शेख, भाजपाच्या माधुरी बोलकर, काँग्रेसच्या प्रियंका सूर्यवंशी, अपक्ष वैशाली देवरे, वैशाली पवार यांचा सामना करावा लागणार आहे. यात विद्यमान स्थायी सभापती सलीम शेख यांच्या पत्नी फरिदा शेख यांनी यापूर्वीदेखील याच भागातून निवडणूक लढविली होती. वैशाली देवरे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे.
(ब) सर्वसाधारण महिला गटात शिवसेनेतर्फेदिवंगत माजी नगरसेवक अशोक गवळी यांच्या पत्नी मंदाकिनी गवळी निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या समोर भाजपाच्या पल्लवी पाटील, मनसेच्या कलावती सांगळे, माजी नगरसेवक रेखा जाधव आदिंसह ७ उमेदवार आहेत. माजी नगरसेवक रेखा जाधव यांना ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवीत आहेत.
(क) सर्वसाधारण गटात शशिकांत जाधव यांच्यासमोर बंडखोर अपक्ष उमेदवार धीरज शेळके, शिवसेनेचे शांताराम कुटे, मनसेचे सोपान शहाणे, काँग्रेसचे विजय तिवडे, माकपाचे भिवाजी भावले, राष्ट्रवादीचे ऋषीराज खराटे, माजी नगरसेवक राजेंद्र नागरे, अपक्ष क्र ांती पालवे आदि ८ उमेदवार आहेत. भाजपाचे सुरु वातीपासूनच परस्पर अपेक्षित पॅनल तयार झालेले होते. या भागात भाजपाचे फारसे आस्तित्व नव्हते. विक्रम नागरे यांनी भाजपात प्रवेश करून मोठ्या नेत्यांना आणून काही प्रमाणात पक्षाचे अस्तित्व निर्माण केले आहे.
(ड) सर्वसाधारण गटात भाजपाकडून सुदाम नागरे निवडणूक रिंगणात असून त्यांना त्यांचेच भाचे शिवसेनेचे गोकुळ नागरे, मनसेचे अशोक नागरे, माकपाचे सीताराम ठोंबरे, राष्ट्रवादीचे दत्तू वामन, अपक्ष रवींद्र देवरे यांचे आव्हान असले तरी शिवसेना आणि भाजपा यांच्यातच खरी लढत होणार आहे. या प्रभागातील चारही गटात बंडखोर उमेदवार आहेत. काही प्रमाणात पक्षाच्या उमेदवारांना या बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे.