चामरलेणी : राखीव वनक्षेत्रामधील वृक्षांवर चालविली जातेय कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 05:10 PM2019-08-27T17:10:56+5:302019-08-27T17:13:45+5:30
चामरलेणी परिसराचा फेरफटका मारला तर या भागात राखीव वनक्षेत्रात ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, गुलमोहरसारख्या प्रजातींची झाडे अधिक आढळून येतात.
नाशिक : चामरलेणी राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड्यांकडून सर्रासपणे घुसखोरी करत झाडांची कत्त केली जात आहे. त्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या वनक्षेत्रातील वृक्ष कापण्याचा सपाटा अज्ञात लोकांनी लावल्यामुळे वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. राखीव वनक्षेत्र असूनदेखील या भागात सर्रास कु-हाड चालविली जात असून वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे जागरूक नागरिकांनी सांगितले.
चामरलेणी परिसर नैसर्गिक, धार्मिक स्थळ असून या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा बहरलेली आहे. पावसामुळे या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. यामुळे या भागात मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करू लागले आहे. तसेच सकाळ-संध्याकाळच्या सुमारास या भागातील रहिवाशी फेरफटका मारण्यासाठी या परिसराला पसंती देतात. मात्र मागील काही दिवसांपासून या भागात वृक्षांवर काही लाकूडतोड्यांकडून घाव घातला जात आहे. पंधरवड्यापासून या भागात वृक्ष कापणारी टोळी सक्रीय झाली असून अद्याप २० ते २५ झाडांवर कु-हाड अज्ञात संशयितांकडून चालविली जात आहे. याकडे वनविभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा या भागातील वृक्षराजी संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. चामरलेणी परिसराचा फेरफटका मारला तर या भागात राखीव वनक्षेत्रात ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, गुलमोहरसारख्या प्रजातींची झाडे अधिक आढळून येतात. या भागात भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करणे गरजेचे आहे.