चणकापूर, पुनंदमधून आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:14 PM2020-04-13T22:14:03+5:302020-04-13T23:07:41+5:30
चणकापूर व पुनंद धरणात पाणीसाठा असल्याचे निदर्शनास आणून देत या दोन्ही प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीला आवर्तन सोडून कसमादे पट्ट्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार नितीन पवार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्राप्त अहवालानुसार चणकापूर व पुनंद प्रकल्पातून तत्काळ पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
कळवण :चणकापूर व पुनंद धरणातपाणीसाठा असल्याचे निदर्शनास आणून देत या दोन्ही प्रकल्पातून गिरणा व पुनंद नदीला आवर्तन सोडून कसमादे पट्ट्यातील पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी आमदार नितीन पवार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्राप्त अहवालानुसार चणकापूर व पुनंद प्रकल्पातून तत्काळ पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिक व मालेगाव पाटबंधारे विभागाने १५ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे नियोजन केल्यामुळे कसमादे पट्ट्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मालेगाव पाटबंधारे विभाग व गिरणा खोरे प्रकल्प विभागाला तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्यानंतर अहवालानुसार पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी चणकापूर व पुनंद प्रकल्पातून १५ एप्रिल रोजी पुनंद व गिरणा नदीद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी आवर्तनाच्या माध्यमातून गिरणा व पुनंद नदीपात्रात १५ दिवसांचे आवर्तन राहणार असल्याने कसमादे पट्ट्यातील गिरणा काठाला दिलासा मिळाला आहे.
गिरणा व पुनंद नदीचे पात्र कोरडेठाक झाल्यामुळे या नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या कसमादे पट्ट्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कसमादे पट्ट्यातील शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपला मोर्चा गावाकडे वळविला आहे. त्यामुळे आदिवासी व ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला साबण लावून हात धुण्याच्या सूचना दिल्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही तर हात धुणार कुठे, असा सवाल आदिवासी भागात विचारला जात असून, तालुक्यातील दौºयात आदिवासी बांधवानी याबाबत अगतिकता बोलून दाखविल्याचे आमदार नितीन पवार यांनी यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिले होते. कळवण नगरपंचायत, सटाणा नगर परिषद, देवळा ग्रामीण पाणीपुरवठा योजना, दाभाडी बारा गाव पाणीपुरवठा योजना, लखमापूर, ब्राह्मणगाव, लोहोणेर, ठेंगोडा आदी पाणीपुरवठा योजनांसह कसमादे पट्ट्यातील टंचाईग्रस्त भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कळवण तालुक्यातील संबंधित गावांचे पाणी मागणीचे ठराव जोडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा अनियमित सुुरू असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे शहरात लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. कोरोनामुळे मोठ्या शहरातून विद्यार्थी तसेच नोकरदार, व्यावसायिक कसमादे पट्ट्यातील गावाकडे आल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक कुटुंबातील सदस्यांची संख्यादेखील वाढलेली आहे. त्यातच कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पाण्याने हात स्वच्छ धुणे तसेच स्वच्छता राखण्यासाठी शासनाने विविध सूचनांचे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. यामुळे पाण्याचा वापरही वाढला आहे. परंतु अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे शक्य होत नसल्यामुळे इतर ठिकाणांहून पाणी आणणे दुरापास्त झाले आहे.
देवळा तालुक्यातील कालवा लाभ क्षेत्रातील गावांना आवर्तन सोडण्यात येणार आहे. उन्हाळ्यात उभ्या पिकांसाठी व फळबागेसाठी योग्य मागणीनुसार गिरणा नदीच्या काठालगत असणाºया सर्व प्रकल्पांना व गिरणा डावा व गिरणा उजव्या कालव्यास ७५० दलघफू पाण्याचे १५ दिवसांचे आवर्तन १५ एप्रिल रोजी सोडण्यात येणार आहे.
- डॉ. राहुल आहेर, आमदार