चंदनाची उटी कुंकुमकेशरा : नाशिकच्या सिध्दीविनायकाला चंदनाचा लेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 05:13 PM2018-05-21T17:13:28+5:302018-05-21T17:15:21+5:30
चंदन उटी लेप करण्यासाठी भाविकांनाही ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काही भाविकांनी चंदन पावडर मंदिरात दान केली तर उर्वरिच चंदन पावडर ट्रस्टमार्फत आणण्यात आली.
नाशिक : ‘रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा चंदनाची उटी कुंकुमकेशरा, हिरेजडीत मुकुट शोभतो बरा, रु णझुणती नुपुरे चरणी घागरिया...’ या ओळी श्रींच्या आरतीमधील असून वाढत्या उष्णतेपासून गणरायाच्या मुर्तीचे संरक्षण व्हावे या उद्देशाने चंदनाच्या उटीचा लेप हा नाशिकमधील रविवार कारंजा येथील सिध्दीविनायक गणपती मुर्तीला (चांदीचा गणपती) लावण्यात येऊन सोमवारी (दि.२१) मंदिरात चंदन उटी मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला.
एकेकाळी उन्हाळ्यातही थंड वाटणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचे तपमान यंदा मात्र प्रचंड वाढत असल्याने उन्हाची दाहकता शहरात अनुभवयास येत आहे. वाढत्या उष्णतेपासून गणरायाच्या मुर्तीचे संरक्षण व्हावे, यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही रविवार कारंजा येथील सिध्दीविनायकाला चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. दरम्यान, चंदन उटी लेप करण्यासाठी भाविकांनाही ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार काही भाविकांनी चंदन पावडर मंदिरात दान केली तर उर्वरिच चंदन पावडर ट्रस्टमार्फत आणण्यात आली. या चंदन उटीचा लेप संपूर्ण मुर्तीला करण्यात आल्याने मुर्तीचे रुप पालटले आहे. यासाठी अकरा किलो चंदनचा वापर करण्यात आला आहे. चंदन उटी प्रसादाचे वाटप शुक्रवारी (दि.२५) भाविकांना करण्यात येणार आहे. तसेच चंदन उटीसह बाप्पाच्या मुर्तीभोवती मोग-याच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. चंदन आणि मोगºयाचा गुणधर्म शीतल असल्यामुळे उन्हाची दाहकता कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे चंदन उटीचा लेप पंढरपूरच्या विठुमाऊलीला तसेच त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथांच्या मुर्तीलाही लावला जातो. शहरातील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट या संस्थेचे शंभरावे वर्ष असल्याने मंदिरामध्ये विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
http://www.lokmat.com/videos/nashik/nashik-siddhi-vinayak-news-video/
‘जैसे देही तैसे देवे’ या उक्तीनुसार जसा देहाला त्रास होतो तसा देवालाही होतो. त्यामुळे शहरातील वाढत्या उन्हाच्या दाहकतेपासून बाप्पांच्या मुर्तीचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे मुर्तीला चंदन उटीचा लेप करण्यात आला. हे या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. पाच दिवसानंतर या चंदन उटीचा प्रसाद भाविकांना वाटप केला जाईल.
-योगेश कुलकर्णी, मंदिराचे पुजारी