चांदोरीकरांना लागले चित्रीकरणाचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 09:06 PM2020-07-11T21:06:01+5:302020-07-12T02:00:38+5:30
चांदोरी : मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण रद्द झाल्याने निर्मात्यांनी सांगली, सातारा परिसरात चित्रीकरणास प्राधान्य दिले आहे. तेथेही अडचणी निर्माण झाल्याने निर्मात्यांना नाशिक व गोदाकाठ परिसर चित्रीकरणासाठी खुणावत आहे.
चांदोरी : मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण रद्द झाल्याने निर्मात्यांनी सांगली, सातारा परिसरात चित्रीकरणास प्राधान्य दिले आहे. तेथेही अडचणी निर्माण झाल्याने निर्मात्यांना नाशिक व गोदाकाठ परिसर चित्रीकरणासाठी खुणावत आहे.
करंजगाव येथे पेशवेकालीन गढी, पुरातन सिद्धेश्वर मंदिर, गोदाघाट, नांदूरमधमेश्वर येथील पक्षी अभयारण्य, धरण, इंग्रजांनी बांधकाम केलेले तसेच अनेक वटवृक्षांच्या सान्निध्यातील विश्रामगृह, चांदोरी येथील गोदावरी नदी व पुरातन मंदिरे, जुनी घरे-वाडे, चांदोरीमधील तीन मजली बुद्धविहार, दारणा सांगवी येथील दारणा-गोदावरीचा संगम, संगमावर असलेले मंदिर तसेच कोठुरे येथे पुरातन बाणेश्वर महादेव मंदिर तसेच रामवमनमार्ग, पेशवेकालीन वाडे आदी चित्रपटांच्या अथवा मालिकांसाठी उपयोगी पडू शकेल, असे सौंदर्य गोदाकाठ भागात आहे. त्यामुळे संपूर्ण गोदाकाठ चित्रीकरणासाठी खुणावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकतेच इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे येथे एका मराठी मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले असून, आता गोदाकाठीही रोल.. कॅमेरा.. अॅक्शन...च्या आवाजाची प्रतीक्षा लागली आहे. गोदाकाठ व परिसरात नेहमीच ऊस, द्राक्ष यासह इतरही पिकांचे उत्पादन घेतले जाते. सदैव हिरवाईने बहरलेल्या या भागात अप्रतिम चित्रीकरणाचे सेट उभारता येऊ शकतो, असे ग्रामस्थ व चित्रपटरसिक सांगतात.
--------------
शंभर वर्षांपूर्वीचा चित्रीकरणाचा इतिहास
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी कालिया मर्दन हा मूकपट सन १९१९ मध्ये म्हणजेच १०० वर्षांपूर्वी बनवलेला होता. त्याचे चित्रीकरण चांदोरी व सायखेडा आदी गावात झाले होते. तसेच राजदत्त निर्मित वि. दा. सावरकर मालिकेचे चित्रीकरणही चांदोरी गावात झाले. त्यामुळे गोदाकाठ भागाला चित्रीकरणाचा ऐतिहासिक वारसा असल्याचेही ग्रामस्थ सांगतात.
--------------------------------------
व्यवसायांना चालना
चित्रीकरणासाठी केली जाणारी गोदाकाठची निवड स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राहण्याची व्यवस्था, वाहतूक, जेवण याचबरोबर स्थानिक कलाकारांना यामुळे रोजगार मिळण्यास मदत होईल, असा आशावादही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.
-------------
सोशल मीडियावर फिरत असलेल्या चांदोरी येथील नदीकाठच्या फोटोमुळे चित्रीकरण करण्याच्या दृष्टीने भेट दिली असता गोदावरीचे वेगळेच रूप पहावयास मिळाले. यापूर्वी नाशिक येथील गोदाघाटावर पीके, बुलेटराजा आदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. चांदोरी येथील गोदाघाट सुंदर आणि रमणीय आहे. त्यामुळे तेथेदेखील चित्रीकरणाचा प्रयत्न आहे. -अमित कुलकर्णी, चित्रपट निर्माता