चंद्राई बंगला अगदीच सुनासुना
By admin | Published: June 17, 2015 02:01 AM2015-06-17T02:01:40+5:302015-06-17T02:03:02+5:30
चंद्राई बंगला अगदीच सुनासुना
नाशिक : अगदीच गर्दी नाही तरी नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेला चंद्राई बंगला म्हणजे भुजबळ फार्म मंगळवारी (दि.१६) अगदीच सुनासुना भासत होता. सकाळी साडेनऊ वाजेपासूनच बंगल्याचा ताबा लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी घेतल्याने बंगल्याची प्रवेशद्वारे बंद झाली होती. पक्षात राहून समर्थकांभोवती सुरक्षेचे कडे उभारणाऱ्या भुजबळांच्या बंगल्याबाहेर मात्र साध्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचे मोहोळही नव्हते.चंद्राई बंगल्याच्या पाठीमागेच राजवाड्याप्रमाणे उभारलेल्या आलिशान भुजबळ पॅलेस बंगल्यांभोवती सुरक्षेचे आणि तपासणीचे कडे सकाळपासून उभारले गेले होते. अगदी काही तासांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री व माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डझनाने हजर असलेले राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारीही या झडतीसत्राच्या वेळी बंगल्याजवळ फिरकले नसल्याचे चित्र होते. बंगल्यात केवळ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मातोश्रींसह चार दोन खंदे समर्थक हजर असल्याचे कळते.
एरव्ही साध्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते थेट जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपर्यंत आणि बाजार समितीपासून ते जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीपर्यंत सर्वच बाबतीत निर्णयकेंद्र ठरलेले भुजबळ फार्म मंगळवारी अगदी कसे सुने सुने भासत होते. सारे कसे शांत शांत होते. ही वादळापूर्वीची शांतता होती की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वादळी कारवाईमुळे निरव पसरलेली शांतता, असा प्रश्न यानिमित्ताने केला जात ता. घर फिरले की घराचे वासेही फिरतात, या उक्तीनुसारच चंद्राई बंगला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या झडतीसत्रामुळे सुनासुना भासत होता. नाशिकच्या राजकीय पटलावर जळी-स्थळी भुजबळ एके भुजबळ असे समीकरण रूढ झालेले असताना अचानक या झडतीसत्राच्या कारवाईमुळे भुजबळ समर्थक कमालीचे हबकून गेले आहेत.