चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) धरणांतून विसर्ग
By admin | Published: August 5, 2016 12:34 AM2016-08-05T00:34:13+5:302016-08-05T00:34:22+5:30
कळवण : तालुक्यातील नद्यांना आला पूर, सतर्कतेचा इशारा दिल्याने यंत्रणा तळ ठोकून
कळवण : तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने हजारो क्यूसेसने पूरपाणी गिरणा व पुनंद नदीपात्रात सोडण्यात येत आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिल्याने पाटबंधारे विभागाची यंत्रणा २४ तास धरण लाभक्षेत्रात व धरणावर तळ ठोकून आहे. कमी अधिक प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांना या पूरपाण्याचा फटका बसला आहे .
चणकापूर लाभक्षेत्रात आज रात्री सकाळपासून ४५ मिमी पाऊस पडल्याची नोंद असून आतापर्यंत ६६१ मिमी. पाऊस चणकापूर धरणक्षेत्रात झाला असून मागील वर्षी ५५० मिमी. पाऊस पडल्याची नोंद आहे. यंदाच्या वर्षी १११ मिमी. पाऊस अधिक झाला असून आज सकाळी ९२३५ क्यूसेसने पूरपाणी गिरणा नदीपात्रात विसर्ग करण्यात आले. आज चणकापूर धरणात पाण्याचा साठा १६५६ दशलक्ष घनफूट झाला आहे, तर अर्जुनसागर ( पुनंद ) धरणक्षेत्रात ६७ मिमी. पाऊस काल रात्री, सकाळपर्यंत पडल्याची नोंद असून आतापर्यंत धरण क्षेत्रात ८३७ मिमी पाऊस पडला असून मागील वर्षी ३५० मिमी. पाऊस पडला होता. यंदाच्या वर्षी ४८७ मिमी. पाऊस अधिक झाला असल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. अर्जुनसागर (पुनंद) धरणातून आज सकाळी ४७३८ क्यूसेसने पूरपाणी पुनंद नदीपात्रात विसर्ग करण्यात आले असून आज ५४ टक्के पाणीसाठा धरणात आहे. गेल्या महिन्याभरापासून चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून हजारो क्यूसेसने पूरपाणी विसर्ग करण्यात येत आहे.
चणकापूर, गोसरणे, अभोणा, पाळे बुद्रुक, पाळे खुर्द, बेज, नाकोडे, कळवण, एकलहरे, बगडू, पिळकोस, सुपले दिगर, काठरे दिगर, सुळे, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, देसराणे, नाळीद, मोकभणगी, खेडगाव, ककाणे या नदीकाठावरील गावांना गिरणा व पुनंद नदीपात्रातील पूरपाण्याचा फटका बसला असून शेती व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तांबडी नदीला आलेल्या पुरामुळे शृंगारवाडी येथील आदिवासी शेतकरी मोतीराम पवार यांच्या
शेतीचे व कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची तक्रार कळवण पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात पूरपाणी घुसल्याने शेतांचे व शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील धनोली, भेगू, ओतूर, नांदुरी, गोबापूर आदिंसह लघु पाटबंधारे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले असून नदीपात्रात पाणी विसर्ग होत असल्याने तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आल्याने साकोरा येथील नदी नाल्यावरील सिमेंट बंधारा वाहून गेल्याची तक्र ार ग्रामस्थांनी केली आहे. गिरणा, पुनंद, बेहडा, तांबडी नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी कळवण, अभोणा, मानूर, जुनी बेज, एकलहरे, गांगवण, बिजोरे, भादवण, दळवट, मोकभणगी, पिळकोस गावातील नागरिकांनी नदीपात्रालगत एकच गर्दी केली होती. चणकापूर प्रकल्पातून, चणकापूर उजव्या कालव्यातून हजारो क्यूसेसने पाणी विसर्ग करण्यात आले असून तालुक्यातील पाझर तलाव, सिमेंट बंधारे १०० टक्के भरले आहेत. येत्या २ ते ३ दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून धरणातून हजारो क्यूसेस पूरपाणी सोडण्यात वाढ केली जाणार असल्याने गिरणा व पुनंद नदीला पूर येणार
असल्याने नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कळवण तालुक्यातील छोटी व मोठी लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरली असल्याने भविष्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून शेकडो पाझर तलाव व सिमेंट बंधारे पावसामुळे तुडुंब भरल्याने परिसरातील विहिरींच्या पातळीत वाढ झाली असून लघु पाटबंधारे प्रकल्प, तलाव व बंधारे तालुक्यातील शेतकरी बांधवांना वरदान ठरली आहेत. (वार्ताहर)