चंद्रपूर, खापराळेकरांनी वेशीतच रोखले ‘कोरोना’ला..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:31+5:302021-04-07T04:14:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिन्नर : शहरासह तालुक्यातील १२५ गावांपैकी केवळ चंद्रपूर आणि खापराळे या दोन गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाला ग्रामस्थांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : शहरासह तालुक्यातील १२५ गावांपैकी केवळ चंद्रपूर आणि खापराळे या दोन गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाला ग्रामस्थांनी ‘एंट्री’ दिलेली नाही. कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे केलेले पालन आणि ग्रामस्थांची एकजूट यामुळे कोरोनाला वेशीबाहेरच रोखण्यात या दोन गावांना यश मिळाले आहे.
गेल्या वर्षी सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर वर्षभरात टप्प्याटप्प्याने सिन्नर शहरासह ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. मात्र, सिन्नरपासून पश्चिमेला सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूर व खापराळे या दोन गावांमध्ये अद्यापही कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. चंद्रपूर आणि खापराळे गावांमध्ये ग्रामस्थांनी घेतलेली काळजी आणि पाळलेले नियम उल्लेखनीय आहे.
चंद्रपूरची लोकसंख्या ६१०, तर खापराळे गावाची लोकसंख्या ४०५ आहे. या दोन्ही गावांमधील अंतर एक किलोमीटर असून, चंद्रपूर-खापराळे ग्रुप ग्रामपंचायत आहे. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती असून, दुग्ध व्यवसायही मोठ्या प्रमाणात आहे. गावात दोन दूध संकलन केंद्रे आहेत. ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाविषयी जनजागृती करण्यासह आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविकांकडून विशेष खबरदारी घेऊन घरोघरी सर्वेक्षण आणि तपासणी करण्यात येते. जनजागृतीवरही विशेष भर देण्यात आला आहे. दोन्ही गावे डोंगराळ प्रदेशात असून, ग्रामस्थांचे सिन्नरला येणे-जाणे आहे. या गावातील नागरिक पुणे किंवा मुंबईसारख्या मोठ्या महानगरांसोबत जास्त संपर्कात नाहीत. त्यामुळे या गावांत मुंबई-पुण्यातून येणारे कोणीही नाही. ग्रामस्थांना घरपोहोच किराणाचे ‘अॅप’ दिले आहे. गावातील काही ग्रामस्थ याचा वापर करत असल्याची माहिती सरपंच अशोक सदगीर यांनी दिली.
गावात आतापर्यंत झालेले विवाह हे शासनाच्या नियमाप्रमाणे अतिशय मोजक्याच वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडल्याचे सरपंच अशोक सदगीर यांनी सांगितले. दूध व्यवसायानिमित्त ग्रामस्थांची सिन्नरला ये-जा असली, तरी नागरिक मास्कचा वापर करतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात अद्याप चंद्रपूर आणि खापराळे या दोन गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. सणासुदीला बाहेरगावातील नातेवाईक या गावात येऊन गेले; मात्र नियमांचे पालन प्रामाणिकपणे केल्याने सुदैवाने कोणीही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.
कोट...
चंद्रपूर-खापराळे ग्रुप ग्रामपंचायत आहे. या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत सहकार्य केले. विवाह सोहळे अतिशय मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत उरकले. मास्कचा वापर केला. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, बाहेरगावी ये-जा करताना काळजी घेतली. त्यामुळे गावात कोरोनाला येऊ दिले नाही.
- अशोक सदगीर, सरपंच, चंद्रपूर-खापराळे
कोट...
ग्रामस्थांनी प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. जनजागृतीवर विशेष भर दिला. दुग्ध व्यवसाय करणारे व भाजीपाला विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले. ‘माझे कुटंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी केली.
- जे. एस. साखरे, ग्रामविकास अधिकारी, चंद्रपूर-खापराळे
फोटो- ०५ अशोक सदगीर, सरपंच ०५ जे. एस. साखरे, ग्रामविकास अधिकारी
===Photopath===
050421\241605nsk_21_05042021_13.jpg~050421\241605nsk_22_05042021_13.jpg
===Caption===
अशोक सदगीर~जे. एस. साखरे