.चंद्रशेखर बावनकुळे : खामखेडा येथील विद्युत वीज उपकेंद्राचे उद्घाटन
By admin | Published: January 29, 2015 11:47 PM2015-01-29T23:47:01+5:302015-01-29T23:47:15+5:30
वीज सेवा लोकाभिमुख करणार
खामखेडा : विजेची आजची स्थिती गंभीर असून, अनेक शेतकऱ्यांना पाणी आहे तर वीज नाही. काही ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा होतो. भारनियमन, वीजगळती व अधिकाऱ्यांची कार्य करण्याची पद्धत बदलून वीज सेवा लोकाभिमुख करणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
खामखेडा येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बावनकुळे पुढे म्हणाले, लोकांच्या समाधानासाठी काम करावयाचे असून, कागदावर योजना करून ठेकेदारांच्या भल्यासाठी योजना न राबवता लोकाभिमुख काम करण्याची गरज आहे. फीडरनिहाय शेतकरी व अधिकाऱ्यांची कृती समिती गठित करून या समितीत त्या गावांमधील सर्व सरपंच, अभियंता, लाईनमन यांना घेऊन कामाचे स्वरूप ठरवून कामात ताळमेळ आणावयाचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी वीज वितरणचे अधिकारी ट्रान्सफॉर्मर जळाल्यास पंधरा-पंधरा दिवस बदलून मिळत नाही. पैशांशिवाय कामे होत नाहीत. अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी केल्या. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता यांना व्यासपीठासमोर उभे करत जाब विचारला.
कार्यक्रमास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार डॉ. राहुल अहेर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंबळे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती उषाताई बच्छाव, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, कार्यकारी अभियंता एल. डी. ठाकूर, उपअभियंता एन. पी. घुमरे, सहायक अभियंता देवरे, चांदेकर, शिनकर, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. अण्णा पाटील यांनी सूत्रसंचालन केले़ (वार्ताहर)