चांदवडला कृष्ण जन्मोत्सव उत्साहात
By admin | Published: August 26, 2016 12:02 AM2016-08-26T00:02:53+5:302016-08-26T00:03:02+5:30
चांदवडला कृष्ण जन्मोत्सव उत्साहात
चांदवड : येथील होळकरकालीन श्री गोवर्धन गिरिधारी गोपालकृष्ण मंदिरात कृष्ण जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती रंगमहाल ट्रस्टचे व्यवस्थापक एम. के. पवार व मंदिराचे पुजारी अंबादास दीक्षित यांनी दिली.
दि. १९ ते २५ पावेतो चाललेल्या या उत्सवात दररोज गीतापाठ, विष्णू सहस्त्रनाम, श्रींचा अभिषेक, रात्री ९ वाजता कीर्तन आदि कार्यक्रम झाले. त्यात परिमल महाराज जोशी, नितीन महाराज मुडावदकर, लौकिक महाराज जोशी तसेच दि. २४ रोजी सकाळी गीतापाठ, विष्णू सहस्त्रनाम, श्रींचा अभिषेक व जयंत महाराज नांदेडकर यांचे कीर्तन व रात्री १२ वाजता कृष्ण जन्मोत्सव, तर दि. २५ रोजी दुपारी १२ वाजता श्रींची महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम झाला. रात्री जयंत महाराज नांदेडकर यांच्या काल्याचे कीर्तनाने जन्माष्टमीचा समारोप झाला.
यावेळी ५६ भोग (विशेष नैवेद्य) समर्पण केल्याची माहिती अरुण दीक्षित, किशोर दीक्षित, अमोल दीक्षित, भूषण दीक्षित व परिवाराने दिली. उत्सव काळात श्रींची मूर्ती अर्धनारी, राधा, बालाजी, देवार्षी नारद, श्रीनाथ अशा विविध रूपात साजशृंगार करून सजविली होती. त्यामुळे भाविकांना नित्यनवीन श्रींचे दर्शन
झाले. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी (गोपाळकाला) ज्या दांपत्याला अपत्यप्राप्ती (संतती) होत नाही अशा जोडप्यांना कीर्तनकार महाराजांच्या हस्ते श्रींचा प्रसाद म्हणून गोपाळकृष्ण ओटीत दिला गेला. गोपालकृष्णावर श्रद्धा ठेवल्यास निश्चित अपत्यप्राप्ती होते. त्यामुळे नवसाला पावणारा चांदवडचा गोपालकृष्ण अशी मंदिराची ख्याती सर्वदूर परिचित आहे. (वार्ताहर)