चांदवडला राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:25 AM2019-04-08T00:25:48+5:302019-04-08T00:26:53+5:30
चांदवड : मांगल्याचे प्रतीक असलेला गुढीपाडव्याचा सण शहरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू नववर्ष स्वागत संचलन झाले.
चांदवड : मांगल्याचे प्रतीक असलेला गुढीपाडव्याचा सण शहरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदू नववर्ष स्वागत संचलन झाले. संघाच्या सहा उत्सवांपैकी गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त आद्य सरसंघचालक प्रणाम घेऊन संचलनाची सुरुवात करण्यात आली. सायं. ६ वाजता घोषाच्या तालावर कृषी उत्पन्न बाजार समिती ते रंगमहालापर्यंत या संचलनाचा समारोप झाला. नागरिक व महिलांनी रस्त्यावर ठिकठिकाणी सडा-रांगोळी काढून तसेच फुलांच्या वर्षावाने संचलनाचे स्वागत केले. यावेळी पूर्ण गणवेशात विविध क्षेत्रातील स्वयंसेवक उपस्थित होते. चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
चांदवड शहरातून महिलांची मिरवणूक
चांदवड शहरातून महिला भगिनींनी यावर्षी प्रथमच नववर्ष स्वागत शोभायात्रा काढली. शोभायात्रेस रंगमहाल येथून शोभायात्रेस सुरुवात झाली. महिलांनी नऊवार नेसून फेटा परिधान केल्याने विशेष आकर्षण ठरले. काही महिलांनी अश्वावर स्वार होत विशेष सहभाग नोंदविला. शोभायात्रेचा समारोप स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागील प्रांगणात झाला.
मनमाडला शोभायात्रा
मनमाड : येथील वेदिका ब्राह्मण महिला मंडळ, श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा काढण्यात आली. दत्त मंदिर शिवाजीनगर येथून निघालेली मिरवणूक सुभाषरोड, गांधी चौक, एकात्मता चौक, नेहरू रोड, रेल्वेस्थानक, इंडियन हायस्कूल, शिवाजी चौक मार्गे काढण्यात आली. दत्त मंदिर येथे रामरक्षा पठणाने शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी शोभायात्रेमध्ये भगवे ध्वज, पताका यामुळे वातावरण भगवेमय झाले होते. श्रीराम जय राम जय जय रामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणा देण्यात आल्या.