चांदवड : मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वादाबाबत तहसीलदारांना निवेदन ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:05 PM2018-02-13T23:05:56+5:302018-02-13T23:53:16+5:30
चांदवड : मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंगरूळ, भरवीर, देवगाव, शिवाजीनगर अशा चार गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे.
चांदवड : तालुक्यातील मंगरूळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंगरूळ, भरवीर, देवगाव, शिवाजीनगर अशा चार गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. परंतु प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशी सन १९९९ पासून ग्रामस्थांची सतत मागणी असून, गेल्या १७ वर्षांपासून ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव पाठवून व पाठपुरावा करूनही ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन होत नाही. त्यामुळे चारही गावांतील ग्रामस्थांनी विभाजन न झाल्याने पुन्हा एकदा या निवडणुकीवर बहिष्कार टाकला, तशा आशयाचे निवेदन तहसीलदार डॉ. शरद मंडलिक यांना ग्रामस्थांनी दिले. यावेळी विलास ढोमसे, विजय पुंजाराम जाधव, अशोक भोसले, सुनील देशमुख, रवींद्र जाधव, सचिन म्हैसधुणे, संजय धाकराव, बाळासाहेब पवार, गणपतराव शिंदे, बाळासाहेब कावळे, प्रकाश देशमाने, योगेश ढोमसे, जालिंदर जाधव, दौलत कांदळकर, शिवाजी चव्हाण, मांगीलाल कांदळकर, गोविंद निरभवणे, गोरख ढगे, अंबादास घोलप, बाळकृष्ण जाधव आदींसह असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत. या विभाजनाचा प्रस्ताव पडताळणी करून दि. ३० मार्च २०१५ रोजी ग्रामविकास मंत्रालयात दाखल केला होता. परंतु सिंहस्थाच्या कारणामुळे ग्रामपंचायतीच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्याने सदरचा प्रस्ताव शासनाने परत पाठविला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या चारही पोटनिवडणुकांवर गावातील ग्रामस्थांनी एकमताने बहिष्कार टाकला व शासनदरबारी दुसºयांदा ग्रामपंचायत विभाजनाचा प्रस्ताव विहित नमुन्यात तयार करून गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त, प्रधान सचिव, पंचायत राज यांच्या कार्यालयामधून सर्व अटींची पूर्तता करून जून २०१७ मध्ये पाठविला असून, आता पाचव्या वेळी ग्रामपंचायत मंगरूळची पोटनिवडणूक लागली आहे. त्यावरही सर्वच ग्रामस्थांनी एकमताने बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत या ग्रामपंचायतीचे विभाजन होत नाही तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला असून, यासाठी मोर्चा, आंदोलने छेडून ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यालयास कायमस्वरूपी कुलूप लावू, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री राज्यमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल अहेर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.