चांदवड शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:56 AM2019-04-10T00:56:47+5:302019-04-10T00:57:30+5:30

चांदवड : तालुक्याला पाणीटंचाईची चांगलीच झळ जाणवू लागली असून, गेल्या महिनाभरापासून शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील ४४ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतील गावांची संख्या वाढून ती संख्या आता ७२वर गेली आहे. यंदा पाऊस न झाल्याने ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल, मे, जूनमध्ये पाऊस पडेपर्यंत पाणीटंचाई जाणवेल, तर काही भागातील विहिरी व बोअरवेलने आतापासूनच तळ गाठला आहे.

Chandwad city gets 8 to 10 days water! | चांदवड शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणी!

चांदवड येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या टाकीतून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

Next
ठळक मुद्देजलाशये कोरडीठाक : तालुक्यातील नऊ गावे, दहा वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

चांदवड : तालुक्याला पाणीटंचाईची चांगलीच झळ जाणवू लागली असून, गेल्या महिनाभरापासून शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील ४४ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतील गावांची संख्या वाढून ती संख्या आता ७२वर गेली आहे. यंदा पाऊस न झाल्याने ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल, मे, जूनमध्ये पाऊस पडेपर्यंत पाणीटंचाई जाणवेल, तर काही भागातील विहिरी व बोअरवेलने आतापासूनच तळ गाठला आहे.
दुष्काळ चांदवड तालुक्याच्या पाचवीलाच पूजलेला आहे. जनतेला पाणीटंचाईपासून मुक्त करावयाचे असेल तर कायमस्वरूपी ४४ गाव नळयोजना व ४२ गावे नळ योजना यांसारख्या योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. तरच तालुका टॅँकरमुक्त होईल.
यंदाच्या वर्षी पावसाळ्यात पाऊस न पडल्याने आज पाणीटंचाईचे संकट भासत आहेत; मात्र गेल्यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने व जलयुक्त शिवारची चांगली कामे तालुक्यात झाल्याने फेब्रुवारी व मार्च महिन्यात जाणवणारी टंचाई गेल्या वर्षी फारशी जाणवली नाही. यंदा मात्र मार्च महिन्यात पहिल्यापासूनच टंचाई जाणवत असून, तालुक्यातील बरीच जलाशये कोरडीठाक पडली आहेत. त्यातील खोकड तलाव, केद्राई, वागदर्डी या धरणांमुळे यावर्षी उन्हाळ्यापूर्वीच दमछाक होत आहे तर जांबुटके, राहुड, दरसवाडी, खडकओझर या धरणात पाणीसाठाच नाही. त्यामुळे एप्रिल व मेअखेर तालुक्यातील टंचाईचे चित्र भयानक असेल असे दिसते. चांदवड तालुक्यात खासगी व सार्वजनिक विहिरी या सुमारे ३००च्या आसपास असून, शेतीला काय तर पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. चांदवड तालुक्यातील काहीच पाऊस न झाल्याने दरवर्षी टँकरची मागणी वाढत असते. यंदा मात्र नऊ गावे व दहा वाड्यांना सहा टँकरने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणीपुरवठा विभागाचे सी.पी. मोरे, सोमनाथ भोसले यांनी सांगितले. त्यात हिरापूर, बोपाणे, कळमदरे, परसूल, उसवाड, नांदूरटेक, देवरगाव, भोयेगाव, जोपूळ या नऊ गावांना, तर हिरापूरची धनगरवाडी, तळेगाव रोहीची दत्तवाडी, बजरंगनगर, घुमरेवस्ती, काजी-सांगवीची दुर्गानगर, नांदूरटेकची चिंचबारी, शिंगवेचे झाल्टे व मढे वस्ती, रामवाडी, खताळ वस्ती, शिंदे व खताळ वस्ती भाटगावची माळीवस्ती या दहा वाड्यांना पाणीटंचाई असल्याने काही गावांना टँकरच्या दोन खेपा, काही गावांना एक, तर काही गावांना दिवसाआड टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, असे पाणीपुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपूर्र्वी अगदी जून ते जुलै महिन्यापर्यंत पाणीटंचाई असल्याने टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागल्याचे पाणीपुरवठा विभाग सांगत आहे.
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता तर बऱ्याच गावांमध्ये जलयुक्तची कामे झाल्याने परिसरातील बंधारे व विहिरींना पाणी टिकले; मात्र यंदा मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने पाणीटंचाईचे हे चित्र मोठ्या प्रमाणात जाणवत असून, एप्रिल व मेमध्ये हे चित्र जास्त जाणवेल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. अजूनही पाणीटंचाईची तीव्रता जसजशी वाढेल तशी टॅँकरची संख्या वाढेल अशी अवस्था सध्यातरी सुरू आहे. वडनेरभैरव व वडाळीभोई भागात बºयापैकी पाणी असल्याने तेथील समस्या एवढी बिकट नाही; मात्र पूर्वपट्टा त्यात दरेगाव, निमोण या गावांना गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते; मात्र या गावांना ४२ गाव नांदगावसह नळ पाणीपुरवठा योजना झाल्याने या भागातील १७ गावांचा पाणीप्रश्न काही अंशी कमी झाला आहे. दरेगाव व निमोण भागातील पाणीटॅँकर बंद झाले होते; मात्र नाग्या साक्या धरणातील पाणीसाठा बेताचा असल्याने येथेही यावर्षी टंचाई जाणवेल, असा अंदाज आहे.
तालुक्याला वरदान ठरणारी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणांची ४४ गाव नळयोजनेचे आता ७२ गावे अशी संख्या झाली असून, ही पाइपलाइन धोडंबे ते चांदवडपर्यंत जुनी झाल्याने अनेक वेळा फुटते तर काही ठिकाणी पाणी चोरीच्या घटना घडत असल्याने बºयाच गावांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, अशी परिस्थिती आहे; मात्र गेल्याच वर्षी राज्य शासनाने चांदवड शहरासाठी ६४ कोटींची पाणी योजना मंजुरी दिल्याने लवकरच ही योजना पूर्णत्वास जाईल असे दिसते, त्यामुळे चांदवड शहराचा पाणी प्रश्न काही अंशी तरी मार्गी लागेल, असे दिसते.
गेल्या वर्षी व आताही परिसरात कांदा बियाणे तयार करण्यासाठी पाणी नसल्याने दोन हजार रुपये प्रति टॅँकर पाणी विकत घेणे भाग पडत आहे. जनावरांना पाणीदेखील मिळणे अवघड झाले आहे. योग्य पाण्याचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. तर दरवर्षी पाणीटंंचाई संकटाबरोबरच अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. आता कुठे एप्रिल महिन्याची सुरुवात झाली; मात्र हीच परिस्थिती मेमध्ये गंभीर होऊ शकते व पाणीटॅँकरची संख्या व टंचाईची गावे वाढण्याची शक्यता आहे.
जनावरांसाठी चारा नसल्याने हालअद्यापपर्यंत चारा मागणी आली नसून मागणी आल्यास चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. तालुक्यात रोजगार हमीची १२८ कामे मंजूर असून, ३४१७ मजूर संख्या आहे, तर १४०० कामे सेल्फवर असून, रोजगार हमीच्या कामाची मागणी आल्याबरोबर कामे दिली जातात. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पाच कामे मंजूर असल्याचे रोहयो विभागाने सांगितले.चांदवड तालुक्यात सध्या ९ गावे, १० वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा केला जातो. मागणी आल्याबरोबरच पाणी टॅँकर सुरू केले जातील तर चारा मागणी आल्यास त्वरित चारा उपलब्ध करण्यात येईल. अद्यापपर्यंत रोजगार हमीच्या कामाची मागणी न आल्यास शासनस्तरावर कामे उपलब्ध केली जातील.
- प्रदीप पाटील,
तहसीलदार, चांदवड

Web Title: Chandwad city gets 8 to 10 days water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.