चांदवडला कांदा, भुसार लिलाव बंदमुळे दीड कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 10:22 PM2021-11-03T22:22:56+5:302021-11-03T22:23:09+5:30
चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद आहेत. तर भाजीपाला, नागवेली पाने, झेंडूची फुले , जनावरे बाजार सुरु आहे. कांदा व भुसार लिलाव बंदमुळे बाजार समितीचे साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.
चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद आहेत. तर भाजीपाला, नागवेली पाने, झेंडूची फुले , जनावरे बाजार सुरु आहे. कांदा व भुसार लिलाव बंदमुळे बाजार समितीचे साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.
बाजार समितीने व्यापारी बैठक घेऊन कांदा लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कांदा व भुसार शेती माल व्यापारी बैठक घेऊन सुट्ट्याचे दिवस वगळता इतर दिवशी लिलाव सुरु ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. २९ ऑक्टोबर पर्यंत भुसार मालाचे लिलाव सुरु होते तर कांदा शेतीमालाचे लिलाव दि. ३० ऑक्टोबर रोजी सुरु असल्याने त्यादिवशी इतर बाजार समितीमधील लिलाव बंद असल्याने चांदवड बाजार समितीतील एक दिवसाची आवक साडेतीनशे नगावरुन एकदम सातशे नग झाल्याचे दिसून येते. दरम्यान, सर्वच बाजार समितीने दिवाळी सण हा भारतीयांचा सर्वात मोठा सण असल्याने हा सण साजरा करण्यासाठी सर्वच मजूर आपापल्या गावी दिवाळी सण साजरा करण्यासाठी जातात. त्यामुळे मजूर उपलब्ध नसल्याने यापूर्वी बाजार समितीमध्ये दिवाळी कारणाने सुट्ट्या राहत होत्या. त्यानुसार यंदाही सुट्ट्या घेतल्याचे बोलले जात असले तरी जिल्हा उपनिबंधकानी बाजार समिती फक्त दिवाळीत केवळ तीन दिवस बंद ठेवावी असा आदेश दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बाजार समितीत दिवाळी सणानिमित्त झेंडू फुलांचे लिलाव सुरु राहतील तर दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळीच लिलाव राहतील असे सभापती डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले.
सलग जर दहा दिवस बाजार समिती दिवाळीच्या कारणाने बंद राहिली तर सर्वच शेतकऱ्यांचे हाल होतील. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊन सर्वच अर्थव्यवस्था कोलमडेल एकतर शेतकरी सर्वच कारणाने त्रस्त आहे. त्यात बाजार समिती बंदमुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची होण्याऐवजी दु:खाची होईल याकरिता भुसार व कांदा लिलाव दोन-तीन दिवसच बंद ठेवावेत म्हणजे शेतकऱ्यांची अडचण होणार नाही.
- कैलास गांगुर्डे, शेतकरी चांदवड
शेतकरी हितासाठी जास्तीत जास्त दिवस शेतीमालाचे लिलाव सुरु ठेवावेत याबाबत बाजार समिती व्यापारी वर्गाची बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेत आहेत. कारण जास्त दिवस बाजार समिती बंद राहिल्यास बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होईल याकरिता बाजार समिती कमीत कमी दिवस लिलाव बंद राहतील असे बघत आहे.
- डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदवड