चांदवडला कांद्याला १८५२ रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:13+5:302021-05-29T04:12:13+5:30
चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची रॅपिड अँटिजन चाचणी विनामूल्य ...
चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची रॅपिड अँटिजन चाचणी विनामूल्य करण्यात येत आहे, तर शेतीमाल विक्रीसाठी नोंदणीची आवश्यकता नाही. प्रचलित पद्धतीने लिलाव होत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सचिव गोरखनाथ गांगुर्डे यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी बाजार समितीच्या आवारात जीप २७० व टॅक्ट्रर १५८ असे एकूण ४२८ वाहनांतून कांदा शेतीमालाची आवक झाली. कमीत कमी भाव पाचशे रुपये व जास्तीत जास्त भाव १८५२ रुपये होता, तर सरासरी भाव १५५० रुपये होता. बाजार समितीच्या वतीने स्थानिक आरोग्य विभागाला कोरोना चाचणी किट उपलब्ध करून शेतकऱ्यांची मोफत चाचणी करण्याची मागणी केल्याने चाचणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चाचणीचा भुर्दंड सोसावा लागत नाही. बाजार समिती पूर्ववत सुरू झाल्यानंतर बाजारसमितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सेवक, व्यापारी, मापारी, हमाल, मदतनीस, मजूर या सर्वांची चाचणी करण्यात आली. त्यात तीन दिवसांत चार हमाल मापारी, एक बाजार समिती कर्मचारी, दोन मजूर, तीन शेतकरी असे दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठविले आहे. शेतीमाल विक्रीसाठी नोंदणीची आवश्यकता नसून प्रचलित पद्धतीने कांदा लिलाव होणार असल्याचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सचिव गोरखनाथ गांगुर्डे व संचालक मंडळाने सांगितले.
------------------------------------------------------
चांदवडला दोन दिवसांत ३५ नवीन रुग्ण
चांदवड : येथे दि. २७ मे रोजी घेतलेल्या ४०८ पैकी १५ अहवाल तर दि. २७ रोजी ४३ पैकी २० अहवाल पॉझिटिव्ह असे ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागांत रुग्ण आहेत. तालुक्यातील चांदवड, भयाळे, डोणगाव, दुधखेड, हरसूल, खडांळवाडी, शेलू, शिंदे, सोग्रस, उसवाड, वडाळीभोई, आडगाव, भोयेगाव, धोंडबा, गणूर, काजीसांगवी, कानमंडाळे, सुतारखेडे, उसवाड, कुंदलगाव, परसूल, पुरी, शिवरे असे एकूण ३५ जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.