चांदवड एस. एन. जे. बी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वयंचलित यंत्राला राष्ट्रीय पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 05:22 PM2019-01-28T17:22:37+5:302019-01-28T17:23:54+5:30
चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन संस्थेच्या स्व. सौ .कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्वयंचलित यंत्राने (स्मार्ट ओनियन प्लांट) आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यूकेशन नवी दिल्लीतर्फे आयोजित केलेल्या छात्र विश्वकर्मा पारितोषिक व सागी इनिशिएटीव्ह अवॉर्ड २०१९ या राष्ट्रीय स्पर्धेत फूड आणि विभागांतर्गत दुसरा क्र मांक पटकावला.
अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील यंत्र अभियांत्रिकीचे विद्यार्थी वृषभ पोफळी (वर्धा), बापू जाधव (राजदेरवाडी ता. चांदवड), देविदास नवले (उर्धुळ ता.चांदवड), निखिल शहाणे (ओझर) व अश्विनी खैरे (हरसूल ता. चांदवड) या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे. या विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व ए.आय.सी.टी.च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सदर पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी दिली. या स्मार्ट ओनियन प्लांटला विद्यापीठस्तरीय आविष्कार २०१८ स्पर्धेतदेखील प्रथम पारितोषिक मिळाले आहे. या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्वयंचलित यंत्रामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कांदे लागवड करता येणे शक्य होणार आहे. या यंत्राद्वारे वाफे तयार करणे, पाण्यासाठी पाट तयार करणे, ड्रीप पसरविणे, खत पसरविणे आदी श्रमाची कामे एकाच वेळी करता येणार आहेत. या यंत्राचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्ये वीस ते पंचवीस मजुरांचे काम हे यंत्र केवळ एका मजुराच्या साहाय्याने करू शकणार आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थांना यंत्र अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. एस. डी. संचेती व प्रा. व्ही. सी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.