चांदवडकरांना २४ तास शुद्ध मुबलक पाण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:08+5:302021-06-24T04:11:08+5:30
चांदवड : चांदवडच्या जनतेसाठी सुमारे ६३ कोटींची स्वतंत्र पाणी योजना सन २०१७ मध्ये तत्कालीन सरकारने मंजूर केली. त्यावेळी ...
चांदवड : चांदवडच्या जनतेसाठी सुमारे ६३ कोटींची स्वतंत्र पाणी योजना सन २०१७ मध्ये तत्कालीन सरकारने मंजूर केली. त्यावेळी या योजनेची मुदत सुमारे दोन वर्षांची होती. आता २०२१ साल उजाडले तरीदेखील चांदवडकरांना २४ तास आठवड्यातील सातही दिवस स्वच्छ मिळणारे पाणी अजूनही घरात आले नाही. या पाणी योजनेस विलंब झाल्याने संबंधित कंत्राटदार व नगरपरिषदेच्या विरोधात माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
चांदवड मतदार संघाचे माजी आमदार जयचंद कासलीवाल यांनी तीन वेळा हॅटट्रीक करून प्रतिनिधीत्व केले. युती शासनाने चांदवड मतदार संघातील जनतेला अनेक योजना दिल्या. त्यात चांदवड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या चांदवडसह ४४ गाव नळपाणी पुरवठा योजनेचा समावेश असून आज तालुक्यातील सुमारे ७८ गावांना या योजनेंतर्गत पाणी उपलब्ध होते. जयचंद कासलीवाल यांचे चिरंजीव भूषण कासलीवाल यांनी चांदवड नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर प्रथम नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवित भाजपा सरकारकडे व विशेषत: तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चांदवडकरांना सुमारे ६३ कोटींची स्वंतत्र अशी पाणी योजना शहराकरिता मंजूर करून आणली. चांदवडसाठी स्वंतत्र पाणी योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास प्रारंभ झाला. या योजनेतून स्वच्छ व मुबलक पाणी चांदवडकरांना मिळेल, अशी आशा निर्माण झाली. परंतु मध्येच कोरोनाचे संकट उद्भवले आणि कामकाज थंडावले. या पाणीपुरवठा योजनेसाठी ३० सप्टेंबर २०२१ पावेतो मुदतवाढ देण्यात आली. आता सध्या काम प्रगतीपथावर आहे. जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. हेडवर्क, चार पाण्याच्या टाक्या, तसेच जलशुध्दीकरण केंद्र येथील कामांना पूर्णत्व आले आहे. अशुद्ध जलवाहिनीचे काम अवघे तीन किलोमीटर बाकी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, सप्टेंबर महिना अखेर चांदवड शहराला पाणीपुरवठा करणारी योजना पूर्ण होऊ शकते असे सांगितले जात असले तरी उर्वरित दहा टक्के कामाला एक वर्षाचा विलंब लागला आहे. सद्य स्थितीत चांदवड नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय कारकिर्द सुरू आहे. त्यामुळे काम संथ गतीने सुरू आहे. यावर भूषण कासलीवाल यांनी कंत्राटदार व नगरपरिषद यांनी वेळेवर काम पूर्ण करावे यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तर या याचिकेची सुनावणी होऊन लवकरच निकाल लागून उपेक्षित चांदवडकरांना पाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इन्फो
काय आहे ही योजना?
चांदवड शहरासाठी नगरपरिषदेकडून मंजूर झालेल्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत स्वतंत्र योजनेत २४ तास पाणी व तेही सात दिवस मिळणार असल्याने अनेक वर्षांपासून चांदवडकरांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या योजनेचा कार्यादेश १७ ऑक्टोबर २०१७ रोजी देण्यात आला असून सुमारे ६३.१० कोटींची योजना आहे. या अंतर्गत ओझरखेड धरण ते चांदवड शहरापर्यंत पाण्याच्या पाईपलाईनद्वारे २४ तास पाणी पुरवठा होणार आहे. त्यामध्ये ओझरखेड ते चांदवड ४८ किलोमीटरची लाईन असून यापैकी ४५ किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण झाली आहे. चंद्रेश्वर गडाच्या पायथ्याशी १०.५ एम.एल.डी.चे जलशुध्दीकरण केंद्र आहे. शहरामध्ये जलशुध्दीकरण केंद्रामधून शुध्द पाण्यासाठी चार नवीन जलकुंभांची नवीन निर्मिती करण्यात येत आहे. प्रत्यक्षात पाणी देण्यासाठी सुमारे ६० किलोमीटर पाईप लाईन वितरण व्यवस्था पूर्ण झाली आहे.
इन्फो
देवस्थानांनाही होणार लाभ
चांदवडकरांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील धरणातून १.२०४ दशलक्ष घन मीटर पाणी आरक्षित केले आहे. यामध्ये वनविभाग, नॅशनल हायवे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख परवानग्यादेखील मिळाल्या आहेत. येणाऱ्या पुढील एक वर्षाच्या आत या योजनेचे पाणी जनतेला उपलब्ध होईल. त्यामुळे चांदवडकराचा पाणी प्रश्न सुटणार आहे. या पाणी योजनेत चांदवड शहरातील श्री रेणुका देवी मंदिर ,चंद्रेश्वर महादेव मंदिर, श्री ईच्छापूर्ती गणेश मंदिर श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्था यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहेत.
फोटो- २३ चांदवड वार्तापत्र-१
चांदवड शहरासाठी तयार झालेले जलशुध्दीकरण केंद्र.
फोटो - २३ चांदवड वार्तापत्र २
नळपाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेले जलकुंभाचे काम.
===Photopath===
230621\23nsk_5_23062021_13.jpg~230621\23nsk_6_23062021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ चांदवड वार्तापत्र-१ चांदवड शहरासाठी तयार झालेले जलशुध्दीकरण केंद्र. ~फोटो - २३ चांदवड वार्तापत्र २ नळपाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेले जलकुंभाचे काम.