चांदवडला कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:05 PM2020-06-12T21:05:31+5:302020-06-13T00:16:57+5:30
चांदवड : शहरातील सर्व गल्लीतील घाण, रिकाम्या बाटल्या, पालापाचोळा पावसाळ्यात वाहून शहराच्या बाहेर असलेल्या चांदवड मर्चण्ट बॅँक कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ येते.
चांदवड : शहरातील सर्व गल्लीतील घाण, रिकाम्या बाटल्या, पालापाचोळा पावसाळ्यात वाहून शहराच्या बाहेर असलेल्या चांदवड मर्चण्ट बॅँक कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ येते. तेथून पुढे खंडेराव मंदिराकडे जाणारा नाला नेहमीच दरवर्षी तुंबतो. त्यामुळे कॉलनीवासीयांना घाणीच्या साम्राज्यात राहावे लागते. ही बाब नगर परिषदेच्या वेळोवेळी लक्षात आणून देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चांमको बॅँक कॉलनीतील नागरिकांनी केला आहे. यावेळी पवन प्रचापत, बाळा सोनवणे, रोहित देव, सोनू शहा, बाळासाहेब ठाकरे, पारसमल लुणावत, हैदर घाशी, बाळासाहेब राहाणे, गणेश होणराव व नागरिकांनी तक्रार केली आहे.
----------------------
स्वच्छता, संरक्षक
भिंतीची मागणी
शहरातील हत्तीखाना परिसरामध्ये स्वच्छता व अतिक्रमण काढून परिसराला संरक्षण भिंत करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी चांदवड नगर परिषदेचे अभियंता अनिल कुरे, संजय गुरव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राहुल जाधव, गणेश लहरे, विवेक जाधव, नीलेश पवार, दीपक देवरे, चेतन ढोमसे व परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले़परिसरात अनेक ठिकाणी काटेरी झाडे, बाभूळ आहेत. ती तोडण्यात यावी तसेच या परिसरात मोठ मोठे कचरा ढीग पडले असून कचरा कुंडी ठेवण्याची मागणी निवेदनात केली आहे. नितीन जाधव, भूषण उशीर, शेखर बिल्लाडे उपस्थित होते़
--------------------------
शहरात स्वच्छतेचा मोठा गाजावाजा होत असताना स्वच्छतेवर लाखो रुपये नगर परिषद खर्च करत आहे. याला चांमको बँक कॉलनी अपवाद आहे. येथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची माहिती योगेश अजमेरा, सुरेश देशमुख, नितीन थोरे व परिसरातील नागरिकांनी दिली. कॉलनीवासीयांनी वारंवार सांगूनही नगर परिषदेचे कर्मचारी दखल घेत नाहीत.
-----------------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता राखणे गरजे असताना नगर परिषद याकडे का दुर्लक्ष करते असा प्रश्न पडला. तात्काळ याबाबत साफसफाई न झाल्यास कॉलनीवासीय साफसफाई कर भरणार नाही व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास याला नगर परिषद जबाबदार राहील, असे कॉलनीवासीयांनी सांगितले आहे.