ध्येय गाठण्यासाठी दृष्टिकोन बदलावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 06:58 PM2018-10-08T18:58:33+5:302018-10-08T18:59:13+5:30
जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने दृष्टिकोन बदलला पाहिजे. जे आपल्याजवळ नाही त्याविषयी रडू नका. समोरच्याकडे जे चांगले आहे ते शोधले पाहिजे. जे आहे ते आनंदाने स्वीकारा, असे प्रतिपादन साहित्यिक मोहिब काद्री यांनी केले.
निफाड : जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने दृष्टिकोन बदलला पाहिजे. जे आपल्याजवळ नाही त्याविषयी रडू नका. समोरच्याकडे जे चांगले आहे ते शोधले पाहिजे. जे आहे ते आनंदाने स्वीकारा, असे प्रतिपादन साहित्यिक मोहिब काद्री यांनी केले.
शारदीय व्याख्यानमाला कार्यकारी समितीच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला निफाड येथील रविराज मंगल कार्यालयात तीनदिवसीय शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पाहिले पुष्प काद्री ‘ध्येयासक्त जीवन’ या विषयावर गुंफले. शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य द. म. माने यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे प्रायोजकत्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि. दा व्यवहारे व संगमेश्वर पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र राठी यांनी स्वीकारले. वि. दा. व्यवहारे यांनी प्रास्तविक केले. यावेळी प्राचार्य माने यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी निफाड येथील जि. प शाळेचे मुख्याध्यापक नीलेश शिंदे यांचा राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल काद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैनतेय प्राथमिक विद्या मंदिराचे शिक्षक गोरख सानप यांचा उपक्र मशील शिक्षक म्हणून काद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन सुनील कुमावत यांनी केले. व्याख्यानमाला समितीच्या उपाध्यक्ष भारती कापसे यांनी आभार मानले.