चांदवड तालुक्यात अनेक ठिकाणी सत्तापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 10:13 PM2021-01-19T22:13:54+5:302021-01-20T01:29:37+5:30

चांदवड : तालुक्यातील ९० पैकी ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली, तर ५२ ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी (दि.१८) जाहीर ...

Change of power in many places in Chandwad taluka | चांदवड तालुक्यात अनेक ठिकाणी सत्तापालट

चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी रावसाहेब भालेराव यांच्या गटातील उमेदवार निवडून आल्याने आनंदोत्सव साजरा करताना माजी सभापती अमोल भालेराव यांच्यासह सदस्य.

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपचा वरचष्मा : वडनेरभैरवला त्रिशंकू स्थिती; नव्या चेहऱ्यांना संधी

चांदवड : तालुक्यातील ९० पैकी ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली, तर ५२ ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी (दि.१८) जाहीर झाले. त्यात विद्यमान सत्ताधारी गटाविरोधात बहुसंख्य ग्रामपंचायतींचे निकाल लागले. अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. बहुतांशी ग्रामपंचायती या भाजपचा वरचष्मा असल्याचे चित्र दिसत आहे.

चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून, येथेही काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये लढत रंगली. यावेळी मतदारांनी त्रिशंकु कौल दिला. पूर्वी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार उत्तम बाबा भालेराव यांचे वर्चस्व होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला आठ, भाजपला पाच, काँग्रेसला तीन व एक अपक्ष उमेदवार निवडून आला. त्रिशंकू अवस्थेमुळे येथील सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती आल्या आहेत.

चांदवड तालुक्यातील जोपुळ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, दिगंबर वाघ यांच्यामध्ये लढत झाली. त्यात भाजपच्या परिवर्तन पॅनेलला नऊपैकी पाच जागा मिळाल्या. येथे काँग्रेस पिछाडीवर पडली. राजदेरवाडी या आदर्श ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे विद्यमान तालुकाध्यक्ष मनोज जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलला एकहाती सत्ता मिळत सलग तिसऱ्यावेळी सत्ता कायम ठेवण्यात यश आले.

नांदूरटेकला ९ पैकी भाजप चार, काँग्रेसला पाच जागा मिळाल्या. येथे भाजपचे नेते प्रभाकर ठाकरे यांच्याकडे गेल्यावेळी सत्ता होती. यावेळी त्यांना एक जागा कमी मिळाल्याने सत्तांतर झाले. कळमदरेत भाजपला पाच जागा, तर विरोधी पॅनेलला दोन जागा मिळाल्या.

भाजपचे राजेश गांगुर्डे, सुनील गांगुर्डे यांच्या हाती सत्ता आली. गंगावे ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुनील शेलार व त्यांचे चुलत बंधू काँग्रेसचे खरेदी-विक्री संघाचे विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब शेलार व राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रघुनाथ आहेर यांच्यात अटीतटीचा सामना होऊन सातपैकी सहा जागा शेलारबंधूंकडे आल्या. आहेर यांना एकच जागेवर विजय मिळविता आला. उसवाड येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांचे मोठे बंधू राष्ट्रवादीचे अशोक गायकवाड व काँग्रेसचे संजय पवार यांच्यात लढत होऊन पवार गटाने सहा जागा, तर गायकवाड यांना पाच जागांवर समाधान मानावे लागले.
                                       परसूल येथे भाजपची सत्ता आली आहे. तर कातरवाडी ग्रामपंचायतीची चर्चा सर्वत्र जिल्हाभर होती. यात भाजपच्या गीता झाल्टे, नामदेव झाल्टे, बाळू झाल्टे यांच्या ग्रामविकास पॅनेल व शिवसेनेचे कैलास झाल्टे, काँग्रेसचे रामदास झाल्टे यांच्या परिवर्तन पॅेनेलमध्ये लढत झाली. भाजपच्या गीता झाल्टे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने सहा जागांवर विजयश्री मिळवत सत्ता आबाधित ठेवली. विरोधी गटाला एकच जागेवर समाधान मानावे लागले. धोंडबे येथे भाजपचे काका काळे, नंदू उशीर, संपतराव जाधव यांच्या पॅनेलला सत्ता कायम ठेवता आली.

              हरनूल -हरसूल येथे भाजपचे बाजीराव वानखेडे यांच्या गटाला एकहाती सत्ता मिळाली. रायपूरला ११ पैकी सर्वच जागा भाजपने मिळविल्या, तर भडाणे येथेही नऊपैकी नऊ जागांवर भाजपला सत्ता मिळाली. वागदर्डीत राष्ट्रवादीचे म्हसू गागरे यांना काँग्रेसचे प्रकाश जैन यांनी धक्का देत सत्तापरिवर्तन घडविले. यात जैन यांच्या पॅनेलला पाच जागा मिळाल्या, तर वाकी ब्रुदुक येथे भाजपने पाच जागा मिळवत आघाडी घेतली आहे.

                     पाथरशेंबे ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या गटाचे राजेंद्र काळू ठाकरे, कोंडाजी साठे, अंबादास महाले, कैलास शिंदे, माणिक ठाकरे यांच्या पॅनेलचे पाच उमेदवार विजयी झाले, तर विरोधी ग्रामविकास पॅनेलचे राजेंद्र पंडितराव ठाकरे, बाळू ठाकरे, श्रवण साठे यांच्या गटाचे अवघे चार उमेदवार निवडून आले.

दोन सदस्यांना नशिबाने दिली साथ
चांदवड तालुक्यात हरणूल -हरसूल ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनच्या सर्वसाधारण गटातून दीपक अशोक पेंढारी व साहेबराव मोतीराम रौंदळ या दोघांना ९१-९१ अशी समसमान मते मिळाली. त्यामुळे पाचवर्षीय बालक दक्ष जालिंदर वाघ याच्याहस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यात दीपक अशोक पेंढारी हे चिठ्ठीद्वारे निवडून आले, तर गंगावे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनच्या इतर मागासवर्गीय जागेसाठी भाऊसाहेब शेलार व विनोद सुधाकर शेलार या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानेच चिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाऊसाहेब शेलार यांच्या नावाची चिठ्ठी आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
 

Web Title: Change of power in many places in Chandwad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.