मन:स्थिती बदला; परिस्थिती बदलेल उज्ज्वल निकम : ‘खान्देश रत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्यात मांडले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:37 AM2018-01-01T00:37:16+5:302018-01-01T00:38:29+5:30
नाशिक : आपल्या आयुष्यात आत्मविश्वासाला महत्त्व आहे. आत्मविश्वास संघर्ष देण्याची प्रेरणा देतो त्यासाठी मन:स्थिती बदलणे आवश्यक आहे.
नाशिक : आपल्या आयुष्यात आत्मविश्वासाला महत्त्व आहे. आत्मविश्वास संघर्ष देण्याची प्रेरणा देतो त्यासाठी मन:स्थिती बदलणे आवश्यक आहे. ती बदलल्यास परिस्थिती आपोआप बदलते, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी रविवारी (दि. ३१) ‘खान्देश रत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले.
सिडको, लवाटेनगर येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या खान्देश महोत्सवाची रविवारी मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी कर्मभूमी आणि जन्मभूमीने खान्देशी असलेल्या नागरिकांचा ‘खान्देश रत्न’ पुरस्काराने अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, मविप्र अध्यक्ष डॉ, सुरेश शेवाळे, लोकमत नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक किरण अग्रवाल, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश गायधनी, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील आदी उपस्थित होते. यावेळी संवाद साधताना अॅड. निकम यांनी भाषेबद्दल फाजील अभिमान नसावा, असे सांगताना आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि देशाच्या प्रबळ लोकशाहीत देशात एकोपा टिकून राहणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात सगळ्यांना ‘व्हॉट्स अॅप’ नावाचा रोग जडला असून, यापासून दूर जाणे आवश्यक आहे. आजची पिढी शिक्षित होणे आवश्यक असताना पालक दररोज दूरचित्रवाणीवर रटाळ मालिका पाहत बसतात हे चित्र बदलायला हवे, असे न झाल्यास पाल्यांवर आपण काय संस्कार करू हा विचार करणे क्रमप्राप्त आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करत चांगले काम करणे आवश्यक आहे. वाढत्या गुन्हेगारीबाबत बोलताना निकम यांनी गुन्हेगाराला कुठलीही जात किंवा पंथ नसतो, परंतु हल्ली गुन्हेगाराची जात हमखास बघितली जाते आणि याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज पाठविले जातात, हे चित्र थांबणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी अॅड. निकम यांच्या हस्ते आर्कि टेक्ट संजय पाटील, कलाकार कांचन पगार, राजेश कोठावदे, स्वाती पाचपांडे, सुरेश पवार, नंदलाल जगताप, डॉ. रावसाहेब पाटील, प्रमोद कोतवाल, रवींद्र पाटील, गीता माळी, डॉ. विजया पाटील यांना ‘खान्देश रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार सीमा हिरे यांनी खान्देश महोत्सवाच्या आयोजनाची पार्श्वभूमी सांगताना हा महोत्सव केवळ खान्देश पुरता मर्यादित न राहता तो नाशिककरांनीही आपलासा केला असल्याचे सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त स्वाती पाचपांडे आणि राजेश कोठावदे तसेच मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेठकर आणि रवींद्र मालुंजकर, तर आभार रश्मी हिरे बेंडाळे यांनी मानले.
प्रादेशिक समरसतेचा पायंडा
खान्देशातील गिरणा आणि तापी नदी काठच्या संस्कृतीचा नाशिकच्या गोदेशी संगम घडवून प्रादेशिक समरसतेचे अभिसरण घडविण्याचा पायंडा खान्देश महोत्सवातून पाडला गेला तो कौतुकास्पद असल्याचे लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी सांगितले.