विचार बदला, जीवन बदलेल ! : सूरजभाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:44 AM2018-05-26T00:44:08+5:302018-05-26T00:44:08+5:30
मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले.
नाशिक : मनुष्याच्या जीवनात ताणतणाव वाढत असले तरी आजचा दिवस खूपच चांगला गेला, असा विचार करून रात्री निद्रा करा आणि सकाळी उठतानाही हसत मुखाने उठा, विचार बदलला तर जीवनही बदलेल, असे विचार माउंट अबू येथील ब्रह्मकुमार सूरजभाई यांनी व्यक्त केले. पंचवटीतील यशवंतराव महाराज पटांगणावर नाशिक वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि.२५) स्व. माणेकलाल भटेवरा स्मृती व्याख्यानाअंतर्गत सूरजभाई यांनी ‘जीवन : शंका समाधान’ या विषयावर गुंफले. मीनल साठ्ये यांनी त्यांची मुलाखत घेतली. गेल्या चाळीस वर्षात देशाने खूप प्रगती केली तसेच खूप संपत्ती निर्माण केली. शिक्षणाच्या सोयी केल्या, डॉक्टरही घडविले. परंतु रोग बरे होण्याऐवजी वाढतच गेले याचे कारण म्हणजे माणसांमध्ये सकारात्मक बदल होण्याऐवजी नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. यात चूक म्हणजे आपण आपल्या आचार आणि विचारांपेक्षा इंग्रजांच्या जीवनशैलीला आत्मसात केले आहे. असे सांगून सूरजभाई यांनी आपण स्वत:ला बदलले पाहिजे. आणि स्वत:ला बदलणे कठीण नाही. दिवसभरातील घटनांचा सकारात्मक विचार करून निद्रा घेतली आणि त्याच ऊर्जेने सकाळी हसतमुखाने दिवसाची सुरुवात केली, तर विचारांबरोबरच जीवनदेखील बदलले जाते. मानव हा मूलत: बुद्धिमान प्राणी आहे. त्यामुळे जीवन हे सुखासाठी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वासंती दीदी तसेच पुष्पा दीदी आदी उपस्थित होत्या.
आजचे व्याख्यान , विषय : अणु ऊर्जेचा विध्वंसक महाभ्रम आणि जैतापूर प्रकल्प. , वक्ते : राजेंद्र फातर्णेकर.