पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदला

By admin | Published: November 22, 2015 11:05 PM2015-11-22T23:05:34+5:302015-11-22T23:06:02+5:30

शाहू खैरे : जुन्या नाशकात विस्कळीत पुरवठ्याने गैरसोय

Change the water supply schedule | पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदला

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदला

Next

नाशिक : महापालिकेने पाणीकपात सुरू केल्यानंतर त्याचा जुन्या नाशिकमधील उंच-सखल भागाला सर्वाधिक फटका बसत असून, सकाळच्या वेळी अतिशय कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन तारांबळ उडत आहे. सदर विस्कळीत वेळापत्रक बदलून काही भागात सकाळी, तर काही भागात सायंकाळी पाणीपुरवठा करण्याची सूचना कॉँग्रेसचे गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक शाहू खैरे यांनी पाणीपुरवठा विभागाला केली आहे.
महापालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात पाणीकपात सुरू केली असून, त्यादृष्टीने वेळापत्रकही तयार केले आहे. वेळापत्रकानुसार सकाळ, दुपार, सायंकाळी आणि रात्री उशिरा अशा चार सत्रात विभागनिहाय पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु या पाणीकपातीचा सर्वाधिक फटका जुन्या नाशिकला बसत आहे. जुने नाशिकमधील बराचसा भाग हा उंचावर असल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत असतात. सध्या जुने नाशिक परिसरात सकाळी एकवेळ पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु अतिशय कमी वेळात कमी दाबाने होणाऱ्या या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोयच होताना दिसून येत आहे.
अनेक भागात पाणीच चढत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जलकुंभही पूर्ण क्षमतेने भरले जाऊ शकत नाही. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता कॉँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे यांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक नव्याने आखण्याची सूचना विभागाला केली आहे. जुन्या नाशकातील काही भागात सकाळी, तर काही भागात सायंकाळी पाणीपुरवठा करण्यात यावा. त्यामुळे पाण्याचा दाब वाढून नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडून अनुकूलता दर्शविण्यात आली असली तरी अद्याप त्यावर कार्यवाही होत नसल्याने खैरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Change the water supply schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.