पायरवाडी जिल्हा परिषद शाळेचे पालटले रूपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 06:03 PM2021-01-17T18:03:57+5:302021-01-17T18:04:30+5:30
देवगाव : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा केंद्र शाळेच्या अंतर्गत येणारी वाळविहीर हद्दीतील जि.प. शाळा, पायरवाडीचा कायापालट शिक्षकांनी स्वखर्चाने करून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आहे.
देवगाव : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा केंद्र शाळेच्या अंतर्गत येणारी वाळविहीर हद्दीतील जि.प. शाळा, पायरवाडीचा कायापालट शिक्षकांनी स्वखर्चाने करून शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न केला आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय खादे आणि सहशिक्षक राधाकिसन रोंगटे व ग्रामपंचायत वाळविहीर यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी तसेच मनोरंजनातून अध्यापन आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी स्वखर्चाने शाळा रंगरंगोटी करून शाळा परिसर निर्मळ करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोना महामारीच्या ताळेबंदीत राज्यातील शाळा आठ ते नऊ महिने बंद आहेत. या काळात येथील मुख्याध्यापक व शिक्षकाने ग्रामपंचायतीच्या आर्थिक साहाय्यातून व स्वखर्चातून दररोज येऊन शाळा सुधरवण्याचे काम युद्धपातळीवर केले. वैतरणा- घोटी या मुख्य मार्गापासून ७ कि.मी. आणि वाळविहीरपासून दीड कि.मी. असलेल्या पायरवाडी शाळेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे; परंतु येथील कृतिशील शिक्षकांनी आणि ग्रामपंचायतीच्या मदतीने येथील शाळा डिजिटल केली. ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात पायरवाडी जिल्हा परिषद शाळा १ ते ४ थीचे वर्ग असून, शाळेला नैसर्गिक सौंदर्याची साथ लाभली असून, स्पर्धेच्या युगात शाळेला नावीन्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने शिक्षकांनी स्वखर्चातून वर्ग सजावट करून शाळेची रंगरंगोटी केली आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून शाळेला ३२ इंची स्मार्ट एलईडी टीव्ही संच देण्यात आला आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेला परिसर व रंगरंगोटीमुळे शाळेचे रूपडेच पालटले. शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्या नियमित शौचालय वापराबरोबरच परिसर, वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येऊ लागले. शाळेच्या परिसरात वृक्षलागवड, मध्यान्ह भोजन भोजनकक्ष यासारख्या भौतिक सुविधांबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठीही शिक्षकांचे प्रयत्न आहेत. ग्रामस्थांनी मुलांच्या भवितव्याचा विचार आणि शाळेचे बदलते स्वरूप पाहता शिक्षकांना सहकार्य करण्याचा विडा उचलला.
मुख्याध्यापक खादे व सहशिक्षक रोंगटे यांनी शाळेकरिता प्रत्येकी पंधरा हजार व ग्रामपंचायत निधीतून वीस हजार अशा पन्नास हजारांत शाळा डिजिटल करण्याचे काम करून शाळेचा चेहरामोहराच बदलून टाकला. यासाठी वाळविहीर ग्रामपंचायतचे सरपंच सुनील ठाकरे व ग्रामसेविका श्रीमती एस.पी. चव्हाण यांनी सहकार्य केले. शिक्षकांनी स्वखर्चाने केलेल्या डिजिटल शाळेचे कौतुक गटशिक्षणाधिकारी माधुरी कांबळे, बीट विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, केंद्रप्रमुख राजेंद्र नांदूरकर आदींनी केले.