मोर्चासाठी बससेवेचेही बदलले मार्ग
By Admin | Published: September 23, 2016 01:35 AM2016-09-23T01:35:32+5:302016-09-23T01:35:56+5:30
डोंगरे मैदान, द्वारका, महामार्गावर थांबणार बसेस
नाशिक : मराठा क्रांती मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने नाशिक शहरात मोर्चेकरी येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने बसेसचे मार्ग आणि थांबा यांच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल केले आहेत. सदर नियोजन हे शहर तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या बसेससाठी आहे. मोर्चा कालावधी संपेपर्यंत सदर बदल कार्यान्वित राहणार असल्याचे महामंडळाने कळविले आहे.
ग्रामीण भागासाठी बसव्यवस्था
१) डोंगरे वसतिगृह येथून ओझर, सटाणा, पेठ, कळवण, पिंपळगाव, मनमाड, नांदगाव, व येवला येथे जाण्यासाठी बसेसची व्यवस्था असेल. या बसेस चोपडा लॉन्स, रासबिहारी मार्गे महामार्गावर जातील. २) मुंबई, पुणे या ठिकाणी जाणाऱ्या- येणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच धुळे मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांसाठी मीनाताई ठाकरे स्टेडियमजवळ बसेस थांबतील. ३) साक्री-नंदुरबारकडून पुणेकडे जाणाऱ्या बसेस द्वारका पुलावरून उतरतील व पुणे हायवेने नाशिकरोड मार्गे जातील. ४) अहमदनगर ते सेलवास जाणाऱ्या बसेस नाशिकरोड, पाथर्डीरोड मार्गे अंबड लिंकरोडने त्र्यंबकेश्वरकडे जातील. ५) मुंबईकडून धुळेकडे जाणाऱ्या बसेस महामार्ग बसस्थानकावरून द्वारका उड्डाणपुलावरून मार्गस्थ होतील. ६) पुणे मार्गाकडे जाणाऱ्या सर्व बसेस या महामार्ग बसस्थानकावरून सुटतील. ७) प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी द्वारका चौक, मीनाताई ठाकरे स्टेडियम सिडको, मायको सर्कल व बिटको चौक, नाशिकरोड येथे वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)