नोव्हेंबरपासून बँकांच्या वेळापत्रकात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:21 AM2019-10-27T00:21:51+5:302019-10-27T00:22:23+5:30
शहरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वेळापत्रकात एक नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. आता महाराष्ट्रातील बहुतेक बँका एकाच वेळापत्रकानुसार उघडणार आणि बंद होणार आहेत. केंद्रीय आर्थिक मंत्रालयाने बँकांच्या कामकाजाची वेळ एकसमानच करण्याचे निर्देश दिले आहे.
नाशिक : शहरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वेळापत्रकात एक नोव्हेंबरपासून बदल होणार आहे. आता महाराष्ट्रातील बहुतेक बँका एकाच वेळापत्रकानुसार उघडणार आणि बंद होणार आहेत. केंद्रीय आर्थिक मंत्रालयाने बँकांच्या कामकाजाची वेळ एकसमानच करण्याचे निर्देश दिले आहे.
नव्या वेळापत्रकानुसार निवासी क्षेत्रातील सर्व बँका सकाळी ९ वाजता उघडतील आणि संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कामकाज सुरू राहील. या बँका ग्राहकांसाठी बँकांची वेळ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे, तर व्यापारी क्षेत्रातील खातेदारांच्या कामकाजाची (कमर्शियल एक्टिविटी) वेळात बदल करण्यात आला आहे. या व्यापारी क्षेत्रातील वर्गासाठी बँकांसाठी कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होणार असून, संध्याकाळी ६ वाजता बंद होणार आहेत, तर उर्वरित सर्व बँकिंगच्या कामकाजाची वेळ सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.
देशभरातील बँकांचे कार्यालय उघडण्याची वेळ एकच असावी, यासाठी हा नवीन प्रस्ताव देण्यात आला होता. गेल्या जून महिन्यात यासंदर्भात बँकिंग विभागाने बैठकही घेतली होती. त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बँका उघडण्याची वेळ ठरविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
दरम्यान, वेळापत्रकातील बदलांमुळे कर्मचाऱ्यांना अंगवळणी पडलेल्या कामाच्या वेळेचे फेरनियोजन करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. मात्र नवीन वेळापत्रक हे ग्राहक आणि बँकिंगमध्ये एकसूत्रता आणण्याच्या दृष्टीने लाभदायी असल्याचे मत काही बँक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.