कामकाजात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 09:32 PM2020-03-23T21:32:51+5:302020-03-24T00:15:53+5:30
नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मुख्यालयाच्या कामकाजात ३१ मार्चपर्यंत बदल करण्यात आला असून, या कालावधीत काही विभाग पूर्णत: बंद ठेवून अन्य कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मुख्यालयाच्या कामकाजात ३१ मार्चपर्यंत बदल करण्यात आला असून, या कालावधीत काही विभाग पूर्णत: बंद ठेवून अन्य कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय येथे जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत कार्यालयात ५ टक्केच उपस्थिती ठेवण्याचे निर्देश दिले असून, अभ्यागतांना प्रतिबंध करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समिती स्तरावर ५ टक्के उपस्थितीबाबतचे निर्देश देतानाच सार्वजनिक प्रशासन विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे विभाग ३१ मार्चपर्यंत पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत अत्यावश्यक आरोग्य सेवा व प्रशासनाने आदेशीत केलेल्या अत्यावश्यक सेवा कार्यरत राहणार असून, अत्यावश्यक सेवेचे काम असल्यास लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकाऱ्यांनी दूरध्वनी, भ्रमणध्वनी व ई-मेलद्वारे संदेश वहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्हा परिषद, मुख्यालयात जिल्हा परिषद पदाधिकाºयासह सर्व लोकप्रतिनिधी व अभ्यागतांना भेटीसाठी येण्यास टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नाशिक जिल्हा मुख्यालय, पंचायत समिती मुख्यालय व ग्रामपंचायत कार्यालय येथे जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामपंचायततर्फे जनजागृतीकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीत जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत यांच्यामार्फत नागरिकांना विविध सूचना दिल्या जात आहेत. यात प्रामुख्याने हात धुण्याविषयी व गर्दी न करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येत असून, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शासकीय रुग्णालय स्तरावर आवश्यक औषधी व साधनसामग्री उपलब्ध करण्यात आलेली असून, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन स्तरावरून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.