संगमेश्वरातील राजकारणात बदल
By admin | Published: May 27, 2017 11:47 PM2017-05-27T23:47:38+5:302017-05-27T23:47:59+5:30
संगमेश्वर : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधील लढत लक्षवेधी ठरली. माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक नरेंद्र सोनवणे यांना शिवसेनेचे राजाराम जाधव यांनी पराभूत केले.
राजीव वडगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमेश्वर : महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधील लढत लक्षवेधी ठरली. माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक नरेंद्र सोनवणे यांना शिवसेनेचे राजाराम जाधव यांनी पराभूत केले. सर्वसामान्य व कट्टर शिवसैनिकाने मातब्बर उमेदवार असलेल्या सोनवणेंना धूळ चारल्यामुळे संगमेश्वर भागातील राजकारण ढवळून निघाले आहे. संगमेश्वर ते मार्केट यार्डचा परिसर प्रभाग क्र. ८ मध्ये मोडतो. मातब्बर उमेदवारांच्या लढतीमुळे या प्रभागाकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले होते. विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी नरेंद्र सोनवणे यंदा भाजपाकडून उमेदवारी करीत होते. शहरातील सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून त्यांची खास ओळख. शिवाय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे; मात्र प्रभागातील सातत्याने कमी होत असलेला जनसंपर्क व रखडलेली विकासकामे यामुळे मतदारांमध्ये नाराजी होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे राजाराम जाधव सलग पाचव्यांदा न.पा.ची निवडणूक लढवित होते. २००२ मध्ये सखाराम घोडके या विद्यमान मातब्बर नगरसेवकाचा पराभव करीत या सामान्य शिवसैनिकाने आपली ओळख केली होती. नंतरच्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही; मात्र दत्त मंदिर व शिवसेनेच्या माध्यमातून सतत सक्रिय राहणारे राजाराम जाधव यांच्याबद्दल सहानुभूती होती. एकनिष्ठ शिवसैनिक ही त्यांची खास ओळख. या बाबी त्यांना विजयासाठी कामी आल्या आणि त्यांनी पुन्हा एका मातब्बर विद्यमान नगरसेवकाचा पराभव करीत इतिहास घडविला आहे. महिला राखीव गटात शिवसेनेचे शहरप्रमुख रामा मिस्तरी यांच्या पत्नी सुनीता मिस्तरी यांना भाजपाच्या दीपाली विवेक वारूळे यांनी पराभूत केले. संगमेश्वर विभागाचे भाजपा प्रमुख विवेक वारूळे यांच्या त्या पत्नी आहेत. शिवसेना उमेदवारांच्या बंडखोरीमुळे भाजपाला येथे विजय सुकर झाला. ८ अ या महिला राखीव गटात शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश गंगावणे यांच्या पत्नी पुष्पा गंगावणे ह्या विजयी झाल्या. राजेश गंगावणे यांनी केलेली कामे व सुशिक्षित परिवार यामुळे त्यांना विजय मिळणे सुकर झाले. प्रभाग ८ मध्ये तीन शिवसेना व एक भाजपाला जागा राखण्यात यश मिळाले आहे.
प्रभाग ८ क मधील दोन विद्यमान नगरसेवकांच्या लढतीत माजी उपमहापौर सेनेचे सखाराम घोडके स्वीकृत नगरसेवकाने प्रभाग पद्धतीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच विजय मिळवून दाखविला आहे. यापूर्वी झालेल्या प्रभाग पद्धतीच्या दोन निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. १९७८ पासून सतत उमेदवारी करून नगरसेवक पद पटकाविणारे घोडके यंदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. २००२ व २०१३ मध्ये त्यांचा पराभव झाला होता; मात्र दोन्ही वेळेस स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची निवड झाली होती. सलग आठ निवडणुका लढविण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. घोडके यांनी प्रभागात केलेली कामे डिजिटल बोर्ड, प्रवेशद्वार कमानी, पाणीपुरवठा, रस्ते ही कामे त्यांना कामी आली. एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ, नगरपालिका कामकाजाचा अनुभव त्यामुळे त्यांचा दबदबा आहे. ह्या सर्व बाबी त्यांना विजयासाठी कामी आल्या. त्यामानाने विद्यमान नगरसेवक गुलाब पगारे (भाजपा) सर्वच बाबतीत तोकडे पडले. संगमेश्वर हा भाग त्यांच्यासाठी नवा होता. येथे संपर्क कमी होता. त्यामुळे ३८६५ मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झाला.