आघाडीच्या जागावाटपात काही मतदारसंघांत बदल : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 07:54 PM2019-09-16T19:54:01+5:302019-09-16T19:56:02+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे सोमवारी नाशकात आगमन झाले. विधानसभानिहाय पक्ष पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक येथे भेट झाल्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करेल,
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कॉँग्रेस व राष्टÑवादी राज्यात प्रत्येकी सव्वाशे जागा लढविणार असून, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. आघाडीच्या या जागावाटपात राज्यातील पाच ते दहा विधानसभा मतदारसंघांत बदल केले जातील. त्याबाबतचा निर्णय दोन्ही कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष घेतील, असे सांगून राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, आघाडीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा सहभाग राहणार नसल्याचे स्पष्ट केले. ईव्हीएमच्या विरोधात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची राज ठाकरे यांची भूमिका मान्य नसून, मित्रपक्षांनीदेखील मनसेला सोबत घेण्यात सकारात्मकता दर्शविलेली नाही, असेही पवार यांनी पुढे सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे सोमवारी नाशकात आगमन झाले. विधानसभानिहाय पक्ष पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक येथे भेट झाल्यानंतर निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करेल, असा अंदाज आहे. त्यानंतर साधारणत: २५ ते ३० दिवसांच्या आत व दिवाळीपूर्वी निवडणुकीचा कार्यक्रम आटोपलेला असेल असे सांगून ही निवडणूक दोन्ही कॉँग्रेस व मित्रपक्षांनी एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी जागांचे वाटपही करण्यात आले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, पाच ते दहा मतदारसंघात बदल होतील व त्याबाबतचा निर्णय प्रदेशपातळीवर घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. काही मतदारसंघांमध्ये दोन्ही काँग्रेसचे एकत्रित कॅम्पेनिंग करण्याबाबत नियोजन सुरू असून, प्रत्येक विभागाच्या मुख्यालयात संयुक्त सभा घेण्याचा प्रयत्न आहे. येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीचा जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात येणार असून, राष्टÑवादी कॉँग्रेसने या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देऊन तरुण पिढीचे नेतृत्व उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही पवार यांनी दिली.
सध्याच्या पक्षांतराबाबत बोलताना पवार म्हणाले, जे आमचा पक्ष सोडून तिकडे गेले त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हा त्या त्या पक्षाचा अधिकार असून, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आमच्याही काही लोकांनी सत्तेच्या ओढीने पक्षांतर केले. विरोधी पक्षात राहण्याची त्यांची मानसिकता नसल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. आपण मात्र संसदीय कारकिर्दीच्या ५२ वर्षांपैकी २७ वर्षे विरोधी पक्षात होतो असे सांगून पवार यांनी, विरोधी पक्षात असलो की समाधान मिळते कारण सत्तेत असल्यावर आपण काय निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे कळत नाही. विरोधी पक्षात असल्यावर कोणतीही जबाबदारी नसते. उलट विरोधी पक्षात असताना लोकांच्या संपर्कात राहून सरकार विषयीची वस्तूस्थिती समजत असते, अशी पुष्टीही जोडली.
उदयनराजे भोसले यांनी पंधरा वर्षे राष्टÑवादीत वाया गेल्याची टीका केल्याच्या प्रश्नावर पवार यांनी, राष्ट्रवादीत अन्याय झाल्याचे समज यायला राजेंना पंधरा वर्षे लागली, अशी मिश्कील टिप्पणी केली. त्याचबरोबर भाजप-सेनेत सुरू असलेल्या बेबनावामुळे युती तुटणार काय? या प्रश्नावर बोलताना पवार यांनी, केंद्रात व राज्यात सत्तेची ऊब दोन्ही पक्षांना मिळाली असून, सत्तेची ऊब कोणी सहजासहजी सोडत नाही. या उपरही युती ठेवायची की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे सांगितले. वंचित आघाडीमुळे राज्यातील आठ मतदारसंघात परिणाम झाला आहे. परंतु आता वंचित आघाडीने त्यांनी भूमिका जाहीर केल्यामुळे त्यांना कॉँग्रेस आघाडीत घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे पवार यांनी सांगितले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे असून, लोकसभेला देशाचे नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे, असा मतदार विचार करतो तर विधानसभेला मतदाराला त्याचे मतदारसंघातील प्रश्न, दैनंदिन समस्या लक्षात घेऊन कोण सक्षम उमेदवार त्यावर आपले मत तयार करीत असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उद्योग-धंद्यांची मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कांदा आयात आदी प्रश्नांवर लढविली जाणार असून, नोटबंदीचे परिणाम आता दिसू लागले असल्याचेही पवार यांनी सांगितले.