वाहतूक मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:49 AM2017-08-31T00:49:12+5:302017-08-31T00:49:20+5:30
शहरातील मोठ्या श्रीगणेश मंडळांनी केलेल्या भव्य आरास पाहण्यासाठी शहरवासीय तसेच आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांची शहरात गर्दी होते़ या गर्दीमुळे तसेच वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शहरातील अठरा मार्गांमध्ये बदल केले असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक : शहरातील मोठ्या श्रीगणेश मंडळांनी केलेल्या भव्य आरास पाहण्यासाठी शहरवासीय तसेच आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांची शहरात गर्दी होते़ या गर्दीमुळे तसेच वाहनांमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शहरातील अठरा मार्गांमध्ये बदल केले असून, त्याऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस आयुक्तांनी वाहतुकीतील हे बदल शेवटच्या पाच दिवसांसाठी केले असून, बुधवार (दि़ ३० आॅगस्ट) ते मंगळवार (दि़ ५ सप्टेंबर) सायंकाळी ६ ते रात्री १२ या कालावधीत या मार्गावर वाहतुकीस बंदी असणार आहे़ तसेच हे मार्ग पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल यांच्यासाठी खुले असणार आहे़ याबरोबरच या मार्गावरील स्थानिक रहिवाशांना या मार्गातील बदल लागू नसल्याचे वाहतूक शाखेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे़
वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते :
खडकाळी सिग्नल ते शालिमारमार्गे सीबीएस
खडकाळी सिग्नल ते नेहरू गार्डनकडून मेनरोड व बादशाही कॉर्नरकडे जाणारा रस्ता
त्र्यंबक पोलीस चौकी ते बादशाही कॉर्नरपर्यंतचा रस्ता
गाडगे महाराज पुतळा ते धुमाळ पॉइंट ते मंगेश मिठाई कॉर्नर
सीबीएसकडून शालिमार व नेहरू गार्डनकडे जाणारा रस्ता
मेहेर सिग्नलकडून सांगली बॅँक सिग्नल - धुमाळ पॉइंट - दहीपुलाकडे जाणारा रस्ता
प्रतीक लॉजकडून नेपाळी कॉर्नरकडे जाणारा रस्ता
अशोकस्तंभाकडून रविवार कारंजा तेथून मालेगाव स्टॅँडकडे जाणारा रस्ता
रविवार कारंजाकडून सांगली बॅँक सिग्नलकडे जाणारा मार्ग
वाहतूक मार्गातील बदल
निमाणी बसस्थानक येथून शालिमारमार्गे नाशिकरोडच्या दिशेने जाणारी वाहतूक रविवार कारंजावरून सांगली बॅँक सिग्नलपर्यंत करता येईल़ त्यानंतर सांगली बॅँक सिग्नल ते सारडा सर्कलपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल.
नाशिकरोडहून निमाणीच्या दिशेने येणाºया सर्व प्रकारच्या वाहनांना सारडा सर्कलपर्यंत येता येईल; मात्र शालिमार ते सीबीएसपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल.
अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यान दोन्ही बाजू नो पार्किंग म्हणून घोषित आहे.
किटकॅट चौफुली ते कालिदास कला मंदिरमार्गे सुमंगल कपड्याच्या दुकानामार्गे शालिमार चौकाकडे जाणाºया दोन्ही बाजू वाहतुकीसाठी बंद असतील. या मार्गावर पर्यायी मार्ग म्हणून किटकॅट चौफुलीवरून खडकाळी सिग्नलमार्गे शालिमारच्या दिशेने वाहनचालक जातील.
सीबीएसवरून कान्हेरेवाडी मार्गे किटकॅट चौफुली किंवा शालिमारकडे जाणारी वाहतूक दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असेल.
पंचवटीतील सरदारचौक ते श्री काळाराम मंदिरपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असेल.
मालवीय चौक ते गजानन चौक तेथून नागचौक ते शिवाजी चौक, तेथून मालवीय चौक असा मार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असेल.
निमाणी - पंचवटी कारंजा - मालेगाव स्टॅँड - रविवार कारंजा मार्गावरून अवजड वाहनांना सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. त्यामुळे या मार्गावरून जाणाºया वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून पंचवटी कारंजा - काट्यामारुती चौक - संतोष टी पॉइंट - कन्नमवार पूल - द्वारका सर्कल या मार्गाने नाशिक, नाशिकरोड, अंबड, सातपूर व इतर ठिकाणी जाता येणार आहे.
सीबीएस ते पंचवटीच्या दिशेने जाणाºया शहर बस, अवजड वाहनांना अशोकस्तंभ ते रविवार कारंजा मार्गे पंचवटी कारंजापर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. पर्यायी मार्ग म्हणून अशोकस्तंभ, रामवाडी पूल, मखमलाबाद नाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरी नाका या मार्गे निमाणीपर्यंत जाणार आहेत.