वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो फौजदारी खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:42+5:302021-08-26T04:17:42+5:30
नाशिक: वापरलेल्या वीज बिलाचे युनिटनुसार वीजदेयक अदा करणे ग्राहकांची जबाबदारी आहे. प्रामाणिकपणे वीज बिलाचा भरणा करणारे ग्राहक आहेतच ...
नाशिक: वापरलेल्या वीज बिलाचे युनिटनुसार वीजदेयक अदा करणे ग्राहकांची जबाबदारी आहे. प्रामाणिकपणे वीज बिलाचा भरणा करणारे ग्राहक आहेतच मात्र, विजेचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्यांची देखील कमी नाही. वीज मीटरमध्ये फेरफार करून विजेची चोरी करण्याचे प्रकार अनेकदा उजेडात येतात. अशा ग्राहकांची वीज तोडली जाऊ शकते आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो.
वीज मीटरमध्ये फेरफार करून फुकटात वीज वापरून महावितरणची फसवणूक केली जाऊ शकते. असे प्रकार महावितरणकडून अनेकदा उघडकीसही आणले गेले आहेत. या संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार तडजोड शुल्क तसेच दंडात्मक कारवाई होऊन वीजपुरवठा खंडित होण्यापासून वाचविला जाऊ शकतोही. त्याप्रमाणेच फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये तर वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित करण्याची देखील तरतूद आहे.
--इन्फो
मीटर जप्ती आणि ५० हजारांचा दंड
१) भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५, १३८ व १२५ अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. यामध्ये तडजोडीचा पर्याय असला तरी तडजोड होऊ शकली नाही तर, कायमस्वरूपी वीज खंडित केली जाऊ शकते.
२) वीज मीटरमध्ये फेरफार आढळून आल्यास ग्राहकास ५० हजारापर्यंतचा निव्वळ दंड होऊ शकतो. वीज बिलाची रक्कम, दंड आणि तडजोड रक्कम भरून वीजपुरवठा वाचवता येऊ शकतो.
--इन्फो--
कधीही होऊ शकते मीटर तपासणी
सरासरी वीज बिलापेक्षा सातत्याने वीज बिल कमी येत असल्याचा संशय आल्यास महावितरणकडून केव्हाही मीटरची तपासणी केली जाऊ शकते. अचानक भेटी देऊनही मीटरची तपासणी केली जाऊ शकते. असे मीटर काढून नेण्याची देखील तजवीज आहे. महावितरणच्या विशेष पथकाद्वारे तसेच मोहिमेतही वीज मीटर तपासणी केली जाते.
--इन्फो--
वीज मीटर दुरुस्तीला वेटिंग
वीज मीटर नादुरुस्त किंवा फॉल्टी असल्याच्या संशयावरून काढून घेण्यात आलेल्या वीज मीटरची तपासणी करणाऱ्या कक्षात दुरुस्तीसाठी वेटिंग आहे. यावरून फॉल्टी वीज मीटरच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात येते. काहींना महिना ते दोन महिन्यांनी दुरुस्त केलेले वीज मीटर मिळते.
--इन्फो--
वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. यासाठी विशेष मोहीमही राबविली जाते. वीज चोरांमुळे इतर प्रामाणिक ग्राहकांना भुर्दंड बसू नये याबाबतची दक्षता देखील घेण्यात आलेली आहे. चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्याची तरतूद असून मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई होऊ शकते.