जुन्या नाशिकचा बदलणार चेहरामोहरा
By admin | Published: September 21, 2016 12:34 AM2016-09-21T00:34:49+5:302016-09-21T00:35:15+5:30
स्मार्ट सिटी : हनुमानवाडीचे पालटणार रूपडे, पाणीपुरवठ्यात तंत्रज्ञानाचा वापर
नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या फेरीत अखेर नाशिकचा समावेश झाला आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील बदलानंतर नाशिकचा आणखी नव्या विकास पर्वाला प्रारंभ होणार आहे. नाशिक महापालिकेने सादर केलेल्या आराखड्यानुसार जुन्या नाशिकचा चेहरामोहरा बदलणार असून, ग्रीनफिल्ड अंतर्गत पंचवटीतील हनुमानवाडीचेही रूपडे पालटणार आहे. याशिवाय, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाणीपुरवठा व पार्किंग व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहेत.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या दुसऱ्या फेरीसाठी महापालिकेने ३० जून २०१६ रोजी केंद्राला आराखडा सादर केला होता. दुसऱ्या फेरीत नाशिकची निवड अपेक्षित मानली जात होती. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिक दौऱ्यात नाशिकची स्मार्ट निवड होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नाशिकचा समावेश झाला असून, नाशिकने महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये कल्याण, डोंबिवली, नागपूर, ठाणे शहरांनंतर चौथा क्रमांक मिळविला आहे, तर एकूण २७ शहरांच्या यादीत ११व्या स्थानावर झेप घेतली आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी लोकांचाही सहभाग घेण्यात आला होता. प्रस्ताव तयार करण्यासाठी ‘क्रिसिल’ या नामवंत संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. प्रस्तावात नाशिक महापालिकेने पॅनसिटी, रेट्रोफिटिंग आणि ग्रीनफिल्ड याअंतर्गत तीन प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार जुन्या नाशिकची पुनर्विकास योजना आहे.