पुरामुळे नादुरुस्त मीटर देणार बदलून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:02 AM2019-08-10T00:02:00+5:302019-08-10T00:23:23+5:30
पुराच्या पाण्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांच्या वीजमीटरचे मोठे नुकसान झाले आहे तर अनेकांचे वीजमीटर तुटल्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराची तीव्रता आणि नुकसानीचा अंदाज घेता महावितरणने पूरग्रस्त भागातील नुकसान झालेले वीजमीटर बदलून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
नाशिक : पुराच्या पाण्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांच्या वीजमीटरचे मोठे नुकसान झाले आहे तर अनेकांचे वीजमीटर तुटल्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराची तीव्रता आणि नुकसानीचा अंदाज घेता महावितरणने पूरग्रस्त भागातील नुकसान झालेले वीजमीटर बदलून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
पुरामुळे राज्यात अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महावितरणचे तांत्रिक कर्मचारी, लाइनमन, जनमित्र हे पावसातही वीजयंत्रणा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे मोठ्या परिसरात वीजयंत्रणा सुरळीत झाली असून, पाण्याखाली यंत्रणा असलेल्या ठिकाणी मात्र अद्याप वीज सुरळीत होऊ शकलेली नाही.
अनेक भागांत बिकट परिस्थिती असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वीजयंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येतो. या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीजमीटर नादुरु स्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देणार आहे.
वीजमीटर बदलण्याचे काम त्या-त्या भागातील पूर परिस्थिती निवळताच करण्यात येईल असेदेखील जाहीर करण्यात आले आहे.