श्रीक्षेत्र चंदनपुरीत ‘जय मल्हार’चा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 01:20 AM2021-12-10T01:20:00+5:302021-12-10T01:20:58+5:30
अवघ्या महाराष्ट्रात प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा महाराजांचे श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या निनादाने अवघी पंचक्रोशी दुमदमली तर, मंदिरावर भंडाऱ्याची उधळण करत हजारो मल्हार भक्त खंडाेबाच्या चरणी नतमस्तक झाले.
मालेगाव कॅम्प : तालुक्यातील अवघ्या महाराष्ट्रात प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडोबा महाराजांचे श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे चंपाषष्ठीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या निनादाने अवघी पंचक्रोशी दुमदमली तर, मंदिरावर भंडाऱ्याची उधळण करत हजारो मल्हार भक्त खंडाेबाच्या चरणी नतमस्तक झाले. पहाटे पासूनच चंदनपुरीत भक्तांनी गर्दी केली होती. मंदिरात प्रारंभी नित्य पूजन करण्यात आले. काकड आरती करण्यात आली. त्यानंतर मल्हार भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली. परिसरात पूज्य ग्रंथराज ज्ञानेश्वर माउली हरिनाम सप्ताहाचे हभप रविकिरण महाराज, हभप समाधान महाराज भोजेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. मालेगाव यासह कसमादेना, खान्देश भागातील हजारो मल्हार भक्तांनी चंदनपुरीत गर्दी केली होती. यंदाही कोरोनाचे सावट असताना मल्हार भक्तांमध्ये उत्साह दिसून आला. मंदिर परिसरात तळी भरणे, काठी फिरवणे, नवस फेडणे, वांगी भरीताचा नैवेद्य दाखवणे यासह खोबरे, भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. चंदनपुरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिर व पोलीस प्रशासनाने अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता . विविध कार्यक्रमप्रसंगी चंदनपुरी ग्रामपंचायतचे सरपंच विनोद शेलार, ग्रामविकास अधिकारी टि.एम.बच्छाव, जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य कैलास शेलार, बाबाजी सोनवणे, शिवसेनेचे संजय पवार, जितेंद्र सोनवणे, नामदेव सोनवणे, निंबा शेलार, हभप माणिक महाराज अहिरे ,ग्रामपंचायतचे मुख्य लिपिक शालिंदर जिवरक यांचेसह मल्हार भक्त उपस्थित होते.