तृप्ती देसार्इंवर नाशकात चप्पलफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 11:19 PM2016-05-26T23:19:41+5:302016-05-26T23:28:53+5:30
कपालेश्वर मंदिरातील घटना : गर्भगृहात प्रवेशापासून पुन्हा रोखले
नाशिक : गेल्या आठवड्यात संतप्त भाविकांनी केलेल्या विरोधामुळे श्री कपालेश्वर मंदिरात दर्शनाची संधी न मिळाल्याने गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई पुन्हा श्री कपालेश्वर महादेव मंदिरात आल्या खऱ्या; मात्र जमलेल्या शेकडो भाविकांनी देसाई यांना कडाडून विरोध करून गर्भगृहात प्रवेशापासून रोखल्याने देसाई यांना ‘दूर’ दर्शनच करावे लागले. मंदिराच्या सभागृहातून दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेर पडताच संतप्त जमावापैकी कोणी देसाई यांना धक्काबुक्की केली, तर कोणी त्यांच्यावर विटा व चपलांचा मारा केला; मात्र त्याच परिस्थितीत पोलिसांनी देसाई यांना सुरक्षा कवच करत सुखरूपपणे मंदिराबाहेर काढले व पोलीस वाहनात बसवून नेले. गेल्या आठवड्यात गुरुवारी देसाई मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. तब्बल तीन तास त्या कपालेश्वर मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यालयात तळ ठोकून होत्या. त्यावेळीदेखील मंदिराच्या गुरव तसेच शेकडो भाविकांनी त्यांच्या गर्भगृह प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. मागीलवेळी जाहीर केल्यानुसार देसाई या गुरूवारी सकाळी नाशिकमध्ये दाखल झाल्या. देसाई मंदिरात येणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सकाळपासूनच मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी सव्वाबारा वाजता देसाई मंदिरात आल्या खऱ्या; मात्र त्यांना विरोध दर्शविण्यासाठी सकाळपासूनच मंदिरात पुजारी तसेच शेकडो भाविकांनी ठिय्या दिला होता. देसाई मंदिराच्या आवारात येताच पोलिसांनी त्यांना थेट मंदिरात आणले. तेथे देवासमोर हात जोडल्यानंतर त्यांनी गर्भगृहात जाण्याची तयारी केली; मात्र प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या महिलांनी तसेच मंदिरात जमलेल्या भाविकांनी एकच आरडाओरड करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि काही क्षणातच पोलिसांनी देसाई यांना मंदिराबाहेर काढले. दक्षिण दरवाजाने देसाई मंदिराबाहेर पडत असतानाच जमावापैकी काही भाविकांनी त्यांना धक्काबुक्की केली, तर एका भाविकाने देसाई यांना मारहाण केली. त्यानंतर पोलीस देसाई यांना घेऊन जात असताना मंदिर परिसरात
गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर देसाई यांना पोलिसांनी सुरक्षित पुण्याकडे रवाना केले. परंतु देसाई यांना दुपारी सिन्नर येथे सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा नाशिकला येण्याचा प्रयत्न केला. सदर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी देसाई यांना नाशिकरोडजवळील सिन्नरफाटा येथे अडवून धरले. सायंकाळपर्यंत देसाई सिन्नरफाटा येथे तळ ठोकून होत्या.