प्रभारी कुलगुरुपदी डवले
By Admin | Published: December 15, 2015 10:46 PM2015-12-15T22:46:45+5:302015-12-15T22:50:51+5:30
प्रभारी कुलगुरुपदी डवले
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राजभवनातून विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २० रोजी पूर्ण होत आहे.
नूतन कुलगुरू निवडप्रक्रिया प्रदीर्घ असल्याने २० डिसेंबरपूर्वी नूतन कुलगुरुंची निवड शक्य नसल्याने राजभवनातून प्रभारी कुलगुरू म्हणून विभागीय आयुक्त डवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश डवले आणि विद्यापीठालाही प्राप्त झाले आहेत. २० रोजी डवले हे प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
आरोग्य विद्यापीठाच्या कारकीर्दीत प्रथमच विभागीय आयुक्तांना प्रभारी कुलगुरू म्हणून संधी मिळाली आहे. यापूर्वी तिघांनी प्रभारी म्हणून कामकाज पाहिले असून, तिघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होते.
दरम्यान, विद्यापीठात यासंदर्भातील आदेश आल्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या वतीने कुलगुरू डॉ. जामकर आणि प्र-कुलगुरू डॉ. राजदेरकर यांचा सत्कार करण्यात आला.