घंटागाडी कामगारांचा ठेकेदारांवर आरोप
By Admin | Published: November 14, 2015 11:57 PM2015-11-14T23:57:47+5:302015-11-14T23:58:10+5:30
किमान वेतन : श्रमिक संघाकडून प्रश्न
नाशिक : महापालिकेला वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांनी आरोग्याधिकाऱ्याला हाताशी धरून घंटागाडी कामगारांना उद््ध्वस्त करण्याचे षडयंत्र आखले असल्याचा आरोप घंटागाडी कामगारांची संघटना असलेल्या श्रमिक संघाने एका पत्रकान्वये केला आहे. दरम्यान, श्रमिक संघाने ठेकेदारांसह प्रशासनासमोरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
घंटागाडी कामगारांना सुधारित किमान वेतन देण्यास ठेकेदारांनी विरोध दर्शवित कामगारांवर दबावतंत्राचे आरोप केले आहेत. त्याला प्रत्युत्तर श्रमिक संघाने दिले असून, ठेकेदारांनी एकत्र येत कामगारांविरुद्ध षडयंत्र आखल्याचे म्हटले आहे. श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी म्हटले आहे, की ठेकेदारांकडून कामगारांना सुविधा पुरविल्या जात असल्याचे खोटे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांचा बोलविता धनी वेगळाच असून, काळ्या यादीत असलेल्या आणि महापालिकेचा थकबाकीदार असलेल्या ठेकेदाराला पुन्हा पुन्हा काम दिले जात आहे. सदर ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा. फाळके स्मारकातील उपाहारगृहामधील ठेक्याबाबतही सदर ठेकेदाराच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी.