सनदी लेखापाल जीएसटीसाठी सज्ज
By Admin | Published: July 10, 2017 12:51 AM2017-07-10T00:51:07+5:302017-07-10T00:51:22+5:30
नाशिक : केंद्र सरकारने जीएसटी लागू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने एक राष्ट्र-एक कर संकल्पनेअंतर्गत शनिवारपासून (दि. १) जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालींचे क्षेत्र ढवळून निघाले आहे. बदललेल्या कर प्रणालीमुळे सनदी लेखापाल आणि कर सल्लागारांच्या कामकाजावर ताण वाढणार आहे. कामाचे स्वरूप बदलून कामाचा व्याप वाढणार असला तरी नव्या कर प्रणालीमुळे आर्थिक शिस्त लागेल असे मत या व्यावसायिकांनी व्यक्त केले. त्याचबरोबर व्यापारी आणि व्यावसायिकांनी अधिक सतर्क राहून आर्थिक व्यवहार केले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जीएसटी म्हणजे वस्तू सेवा कर लागू करण्याबाबत भिन्न प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी शासनाला साहाय्यभूत ठरलेल्या वर्गाने मात्र नव्या कर प्रणालीची तयारी केली. विविध नियम आणि परताव्यांचे प्रशिक्षण घेऊन स्वत: सज्ज झालेच, परंतु आपल्याकडील करदात्यांनाही याबाबतचे ज्ञान दिले. सीए असोसिएशनने याबाबत विशेष पुढाकार घेतला आणि सदस्यांना मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून दिले. शनिवारपासून लागू होणाऱ्या या कर प्रणालीसाठी यंत्रणा सज्ज झाली असताना हे व्यावसायिकदेखील बदलत्या आव्हानाला पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत.