नाशिककरांना ‘चटका’ : तापमानात सातत्याने वाढ; पारा पोहचला ४२.८ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 06:07 PM2019-04-28T18:07:01+5:302019-04-28T18:16:40+5:30
नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.
नाशिक : मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहेत. रविवारीसायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.८ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. आठवडाभरापासून शहरवासीयांना उन्हाच्या कडाक्याने हैराण केले आहे. प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने तापमानात वाढ झाली आहे. समुद्रकिनाऱ्यावर चार ते पाच अंशांनी तापमान वाढल्याने उष्णतेची लाट मध्य-उत्तर महाराष्टÑासह विदर्भात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने सोमवारपर्यंत (दि.२९) उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नाशिककरांना उन्हाचा दाह सोसवेनासा झाला आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाययोजनांवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बुधवारपासून नाशिककर कडक्याच्या उन्हाचा सामना करत आहेत. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळिशीपार पोहोचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले तर गुरुवारी काहीअंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारपासून अचानकपणे वातावरणात कमालीचा उष्मा वाढल्याने मागील दहा वर्षांपेक्षा अधिक तापमान शनिवार व रविवारी नोंदविले गेले.
---
नाशिककरांना ‘मे’ची धास्ती
अवघ्या चार दिवसांनंतर मे महिना उजाडणार असून, या महिन्यातील उन्हाच्या तीव्रतेची नाशिककरांनी धास्ती घेतली आहे. कारण एप्रिलअखेर पारा ४१.७ अंशांपर्यंत अर्थात ४२ अंशांच्या जवळपास पोहचल्याची नोंद झाली. मे महिन्यात ऊन अधिक वाढते, त्यामुळे तापमान ४४ ते ४५अंशांपर्यंत पोहचण्याची भीती नागकिरांमधून व्यक्त होऊ लागली आहे. मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी नाशिककरांना उन्हाचा अधिक तीव्र तडाखा बसू लागला आहे.
--
अशी घ्या खबरदारी
उन्हात बाहेर पडताना काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे.
नखशिखांत पांढरे शुभ्र कपड्यांचा वापर व हॅटसारखी पसरट टोपी डोक्यावर परिधान करावी.
बाजारपेठेत फिरताना किंवा दुचाकीवरून मार्केटिंगसारखी कामे करताना थंडपेय पिणे टाळावे.
सूर्य मध्यावर आला असता कष्टाची कामे थांबवावी.
शेतीची कामे दुपारी बारा वाजेपर्यंत आटोपून विश्रांती घ्यावी.
तेलकट व बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
शरीरात पाण्याची मात्रा कमी होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.
ताप, डोकेदुखी, उलट्या यांसारख्या शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये.