सात-बारा दुरुस्तीसाठी जिल्ह्यात चावडी वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:51+5:302021-06-29T04:11:51+5:30

नाशिक : संगणक प्रणालीचा अवलंब करून महसुली विभागाच्या नोंदी एका क्लिकवर आणण्यासाठी तालुका पातळीवर चावडी वाचनास सुरुवात केली आहे. ...

Chawdi reading in the district for seven-twelve repairs | सात-बारा दुरुस्तीसाठी जिल्ह्यात चावडी वाचन

सात-बारा दुरुस्तीसाठी जिल्ह्यात चावडी वाचन

Next

नाशिक : संगणक प्रणालीचा अवलंब करून महसुली विभागाच्या नोंदी एका क्लिकवर आणण्यासाठी तालुका पातळीवर चावडी वाचनास सुरुवात केली आहे. तहसीलदारांच्या माध्यमातून तालुक्यांमध्ये चावडी वाचनाची मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेमुळे संगणकीकृत सात-बारा दुरुस्तीच्या कामाला गती मिळणार आहे. या मोहिमेसाठी आता अवघे दोन दिवसच उरले आहेत.

सात-बारा उतारा संगणकीकरण करताना अचूकता यावी यासाठी ई-फेरफार प्रणालीद्वारे जिल्ह्यामध्ये चावडी वाचनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रांताधिकारी आणि तहसीलदारांच्या माध्यमातून तालुकास्तरावर मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाचपेक्षा अधिक तालुक्यांमध्ये सात-बारा दुरुस्तीची कामे झाली असून उर्वरित तालुक्यांतील कामे देखील तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

ई-फेरफार प्रणालीमध्ये अधिकार अभिलेखाचे कामकाज शंभर टक्के संगणकीकृत झाले आहे. महसूल विभागाच्या नोंदी अद्ययावत व अचूक करण्यासाठी ई-चावडी प्रणालीचा अवलंब करून या प्रणालीमध्ये प्रत्येक गावातील महसुली नोंदीची माहिती संगणकीकृत करण्यात येत आहे. त्यामध्ये सात-बारा उताऱ्याच्या आधारे नोंदणी करण्याला प्राधान्य देण्यात आलेले आहे. हस्तलिखित सात-बारा उताऱ्याच्या नोंदीची पडताळणी व दुरुस्ती करून संगणकीकरण करण्यासाठी तालुक्यांमध्ये विशेष मोहीम राबविली जात आहे.

सात-बारा उताऱ्यातील नोंदीबाबतचे अनेक आक्षेप असतात. या नोंदणीमध्ये असलेल्या त्रुटींबाबतच्या देखील तक्रारी महसूल विभागाकडे केल्या जातात. अशा तक्रारींचे निरसन देखील या मोहिमेत केले जाते. त्यामुळे संगणकीकृत व हस्तलिखित सात-बारा यांचे वाचन करावे, त्यामध्ये काही त्रुटी, तफावत असेल तर त्याबाबतची कारवाई तातडीने करण्यात यावी, अशा सूचना तहसीलदारांना देण्यात आलेल्या आहेत. बुधवार दि. ३० तारखेपर्यंत चावडी वाचन होणार असल्याने या कामाला गती देण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तालुक्यांमधील महसुली गावे असलेल्या ठिकाणी सुरू असलेल्या या चावडी वाचन कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घेऊन आपले संगणकीकृत सात-बारा अद्ययावत करून घेण्याचे आवाहन तहसीलदारांकडून करण्यात आले आहे.

--इन्फो--

सर्व जिल्ह्यात त्या-त्या तालुक्यांमध्ये तहसीलदारांमार्फत चावडी वाचनाचा उपक्रम सुरू करण्यात आला असून या प्रक्रियेत नागरिकांनी सहभागी होऊन आपले संगणकीकृत सात-बारा अद्ययावत करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

.

Web Title: Chawdi reading in the district for seven-twelve repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.