धुळगाव सोसायटीत फसवणूक
By admin | Published: February 2, 2017 10:57 PM2017-02-02T22:57:30+5:302017-02-02T22:58:32+5:30
धुळगाव सोसायटीत फसवणूक
दोघांवर गुन्हा दाखल : पदाचा गैरवापर केल्याचा आरोपयेवला : धुळगाव विकास सोसायटीचे तत्कालीन चेअरमन व सचिव यांनी संगनमताने पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्राचा वापर करून संस्थेची सुमारे सहा लाखांची फसवणूक केल्याचे चौकशीत निदर्शनास आल्याने या दोघांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश येवला सहकारी संस्था सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी विद्यमान चेअरमन यांना दिले.
धुळगाव सोसायटीचे तत्कालीन चेअरमन आप्पासाहेब अंबादास गायकवाड व सचिव सावळेराम धनाजी गोरे यांनी संगनमताने बनावट कागदपत्रांचा वापर करून संस्थेची फसवणूक केली म्हणून त्याचे विरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी संस्थेस दिला आहे. आप्पासाहेब गायकवाड हे सन २००७ ते २०११ पर्यंत संस्थेचे चेअरमन म्हणून कामकाज पाहत होते व त्याच्या पत्नी जिजाबाई आप्पासाहेब गायकवाड सन २००३ ते २००७ पर्यंत संस्थेच्या व्हा. चेअरमन म्हणून कामकाज करत होत्या.
आप्पासाहेब गायकवाड यांनी संस्थेकडून २५ सप्टेंबर २००८ रोजी २ लाख १५ हजार रु पये अल्पमुदत कर्ज व एक लाख ९५ हजार रु पये मध्यम मुदत कर्ज घेतले होते. तसेच जिजाबाई गायकवाड यांनी २२ जून २००७ रोजी एक लाख ७५ हजार रु पये अल्पमुदत कर्ज घेतलेले आहे व कर्जासाठी धुळगाव येथील अनुक्रमे जमीन तारण दिलेली होती.
गायकवाड यांनी या शेतजमिनीवर सोसायटीच्या कर्जाचा बोजा असताना व संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली नसताना पदाचा दुरूपयोग करून संस्थेचे सचिव सावळेराम गोरे यांच्यावर दबाव आणून २५ सप्टेंबर २००८ रोजी ते व त्याच्या पत्नी जिजाबाई या संस्थेच्या सभासद आहेत. परंतु त्याकडे संस्थेचे कोणतेही कर्ज रक्कम वसुलीस पात्र नाही व शेतजमिनीवरील सोसायटीच्या नावाचा बोजा कमी करण्याबाबत ना हरकत दाखला घेतला व ही तारण जमीन श्रावण मुरलीधर मंडलिक व छाया मंडलिक यांना दि. ७ आॅक्टोबर २००८ रोजी विक्र ी केली.
आप्पासाहेब गायकवाड व सावळेराम गोरे हे सन २०११ पर्यंत पदावर कार्यरत असल्यामुळे याबाबत संस्था पातळीवर कोणतीही माहिती उघड झाली नाही. परंतु संस्थेचे विद्यमान चेअरमन दत्तात्रय विठ्ठल गायकवाड यांनी संस्थेची थकबाकी कर्ज व सभासद यांची माहिती घेतली असता, आप्पासाहेब गायकवाड व जिजाबाई गायकवाड यांच्याकडील कर्ज थकबाकी वसुलीस पात्र आहे. परंतु कर्जापोटी संस्थेस तारण दिलेली शेतजमीन २००८ साली विक्र ी केलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी संस्थेचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी मार्गदर्शन व्हावे म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे विनंती अर्ज केला. संस्थेने केलेल्या मागणीनुसार आप्पासाहेब गायकवाड व सावळेराम गोरे यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली त्यामध्ये आप्पासाहेब गायकवाड यांनी संस्थेच्या वसुली पावत्या उपलब्ध नाही असा जबाब दिला तर सावळेराम गोरे यांनी, जमीन-खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्यावर व व्यवहाराचे संपूर्ण पैसे मिळाल्यानंतर संस्थेचे जे काही कर्ज असेल ते व्याजासह संपूर्ण भरणा करून देईल, असे आप्पासाहेब गायकवाड यांनी सांगितल्यामुळे सोसायटीची कर्जबाकी नाही असा दाखला दिला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( वार्ताहर)