‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:58 AM2018-04-03T01:58:00+5:302018-04-03T01:58:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ व ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनांच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यात काही बोगस संस्था आणि व्यक्ती घरोघरी जाऊन नोंदणीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने केंद्र किंवा राज्य शासनाकडून कोणतीही नोंदणी केली जात नसल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाने दिले आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ व ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनांच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यात काही बोगस संस्था आणि व्यक्ती घरोघरी जाऊन नोंदणीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने केंद्र किंवा राज्य शासनाकडून कोणतीही नोंदणी केली जात नसल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाने दिले आहे.
महिला आणि बालिका सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना प्रकल्प अधिकारी तसेच महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविल्या जातात. ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ व ‘माझी कन्या भाग्यश्री’ या आर्थिक लाभाच्या योजना सध्या सुरू आहेत. भाग्यश्री कन्या योजनेसाठी ५० आणि २५ हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट केले जाते तर बेटी पढाओ योजनेत शिक्षण आणि लग्नापर्यंत मुलींना आर्थिक लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने यासाठी शंभर करोडचे बजेट आखले आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेतून गरीब कुटुंबातील मुलींना दोन लाख रुपये रोख मिळणार असल्याचे सांगून नाशिक जिल्ह्णातील ग्रामीण भाग तसेच झोपटपट्टी परिसरात घरोघरी जाऊन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. सदर अर्ज भरून घेण्यासाठी शंभर ते दोनशे रुपये शुल्क आकारण्यात आलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्णातील अनेक गावे तसेच शहरालगत असलेल्या झोपडपट्टी भागातून लाखो रुपये शुल्क गोळा करण्यात आले आहेत. शहर, जिल्ह्णात अशाप्रकारे खोटे नोंदणीचे अर्ज भरून घेतले जात असताना नाशिकमधील जिल्हा यंत्रणेला मात्र याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. लाखो रुपयांच्या आमिषाने गाव, खेडे आणि झोपडपट्टीतील महिला शंभर, दोनशे रुपये सहज काढून देत असल्यामुळे कथित एनजीओ आणि त्यांच्या प्रतिनिधींनी नाशिक जिल्ह्णातून लाखो रुपये गोळा केल्याचा अंदाज आहे. दिल्लीतील भाजपाच्या काही नेत्यांना सदर बाब कळल्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये याबाबतची विचारणा केली असता जिल्हा परिषद तसेच प्रकल्प विभागाकडून अशी कोणत्याही प्रकारे नोंदणी केली जात नसून बनावट एनजीओकडून असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले. याबाबतची चौकशी दिल्लीतून होण्याची शक्यता असल्याने या प्रकारामुळे जिल्हा यंत्रणा चांगलीच हादरली आहे.
दिल्ली भाजपाकडून नाशिकला विचारणा
नाशिक जिल्ह्णात ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ व ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनांच्या नावाखाली बनावट एनजीओ नोंदणी शुल्क आकारून नोंदणी करीत असल्याची बाब दिल्लीतील भाजपा नेत्यांना कळल्यानंतर त्यांनी नाशिकमधील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबतची चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता येथील कोणत्याही शासकीय विभागामार्फत अशाप्रकारची नोंदणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फसवणुकीचा प्रकार उघड झाला. यापूर्वी दिल्लीत अशाच प्रकारे फसवणुकीचा प्रकार समोर आला होता.
शासनाकडून नियुक्तीच नाही
केंद्र आणि राज्य शासनाच्या कोणत्याही विभागाने या योजनांची माहिती जमा करणे तसेच नोंदणी करणे यासाठी व्यक्ती अथवा संस्थांची निवड केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारे माहिती जमा करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येऊ नये. तसेच अशी व्यक्ती आढळल्यास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.
- दत्तात्रय मुंडे, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद