संजय गांधी योजनेच्या नावाखाली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 11:27 PM2016-03-11T23:27:58+5:302016-03-12T00:01:44+5:30

टोळी कार्यरत : लाखो रुपये गोळा केल्याचा आरोप

Cheating in the name of Sanjay Gandhi scheme | संजय गांधी योजनेच्या नावाखाली फसवणूक

संजय गांधी योजनेच्या नावाखाली फसवणूक

Next

नाशिक : संजय गांधी योजनेच्या नावाखाली पेन्शन मिळवून देण्याकरिता नागरिकांकडून प्रत्येकी ६५० ते २००० रुपयांपर्यंतची रक्कम वसूल केली जात असून, त्यासाठी एक टोळीच कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांच्या निदर्शनास सदर प्रकार आल्यानंतर त्यांनी संबंधितांना जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. नंतर संबंधित महिलेने आपला भ्रमणध्वनीच बंद करून टाकला. विशेष म्हणजे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार आपण सदर उपक्रम राबवत असल्याची मखलाशी संबंधित महिलेने केली होती.
शहरात काही महिला नागरिकांकडून पेन्शन योजनेच्या नावाखाली पैसे वसूल करत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक यांच्याकडे काही लोकांनी केली. त्याबाबत पुराव्यादाखल काही अर्जाचे नमुनेही सादर केले. त्यातील एका अर्जावर बॅँक आॅफ इंडिया, मुंबई ब्रॅँचच्या नावाने इंदिरा स्वयंरोजगार योजना, दिल्ली असा उल्लेख असून त्यात बॅँकेकडून व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळावे याकरिता २००० रुपयांचे शेअर्स उघडले असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या अर्जात बॅँक आॅफ इंडिया पुणे ब्रॅँच, संजय गांधी योजना (बेंगळुरू) असा उल्लेख असून त्यातही २००० रुपयांचे शेअर्स घेतल्याचे सांगून कर्जाची मागणी केलेली आहे.
सदर अर्ज नागरिकांकडून भरून घेत त्यांना ३० हजार रुपयांपर्यंत रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून देण्याचे तसेच पेन्शन योजना सुरू करण्याचे आमिष दाखविले जात आहे. त्याकरिता नागरिकांकडून ६५० पासून २००० रुपयांपर्यंतची रक्कम उकळली जात आहे. त्यासाठी काही महिला कार्यरत असून प्रामुख्याने झोपडपट्टी भागात जाऊन बैठका घेतल्या जात आहेत. सदर योजना अथवा कर्जप्रकरणासंबंधी छगन भुजबळांच्या नावाचा वापर केला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. सदर अर्जाचे नमुने पाहता हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येते. (प्रतिनिधी)

Web Title: Cheating in the name of Sanjay Gandhi scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.