लासलगावचे कवी प्रकाश होळकरांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 08:52 PM2018-05-22T20:52:26+5:302018-05-22T20:52:26+5:30

महिलेविरूद्ध गुन्हा दाखल : ‘कोरडे नक्षत्र’ काव्यसंग्रहाच्या नकली प्रतींची छपाई

Cheating of Prakash Holkar of Lasalgaon | लासलगावचे कवी प्रकाश होळकरांची फसवणूक

लासलगावचे कवी प्रकाश होळकरांची फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्दे सविता पन्हाळे नामक महिलेविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल काव्यसंग्रहाच्या सुमारे २ हजार नकली प्रती छापून त्या राज्यभर वितरित करत बदनामी केल्याची तक्रार

नाशिक - ‘कोरडे नक्षत्र’ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून साहित्यप्रांतात परिचित असलेले लासलगाव येथील कवी आणि चित्रपट गीतकार प्रकाश होळकर यांच्या काव्यसंग्रहाच्या नकली प्रतींची छपाई करत पॉप्युलर प्रकाशनासह होळकर यांची फसवणूक करणाऱ्या सविता पन्हाळे नामक महिलेविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर महिलेने प्रकाश होळकरांची पत्नी असल्याचा बनाव रचत ‘कोरडे नक्षत्र’ या काव्यसंग्रहाच्या सुमारे २ हजार नकली प्रती छापून त्या राज्यभर वितरित करत बदनामी केल्याची तक्रारही होळकर यांनी फिर्यादित केली आहे.
सातपूर पोलिस ठाण्यात प्रकाश होळकर यांनी फसवणुकीसंबंधी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादित म्हटले आहे, ‘कोरडे नक्षत्र’ हा काव्यसंग्रह १९९७ साली पॉप्युलर प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला आहे. प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क पॉप्युलर प्रकाशनाला दिले आहेत. या काव्यसंग्रहाला आतापर्यंत अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय, अनेक मराठी चित्रपटांतही त्यातील कवितांचा समावेश झालेला आहे. या काव्यसंग्रहाची द्वितीय आवृत्ती २००५ मध्ये प्रकाशित करण्यात आली आणि तिची किंमत ६० रुपये आहे. परंतु, सदर काव्यसंग्रहाच्या नकली प्रतींची छपाई केल्याचे निदर्शनास आले. या नकली प्रती छापताना पुस्तकाचे मुखपृष्ठ बदलण्यात आले. प्रकाशक म्हणून अरूनिमा प्रकाशन असा उल्लेख करण्यात आला तर प्रकाशिका म्हणून सौ. मंदाकिनी प्रभाकर पन्हाळे असे नाव छापण्यात आले आहे. पुस्तकाची किंमत १०० रुपये ठेवण्यात आली आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूर व ज्ञात नसलेला फोटो छापण्यात आला आहे. सातपूर मधील एका प्रिटींग प्रेसमधून सदर नकली पुस्तकांची छपाई करण्यात आली. सदर कृत्य हे सविता पन्हाळे या महिलेने केल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकाशक म्हणून उल्लेख केलेल्या तिच्या आईला फोनवरून विचारणा केली असता त्यांनी या सा-या प्रकाराबाबत अनभिज्ञता दर्शविली. सविता पन्हाळे ही महिला एलआयसीमध्ये सेवेत असून तिने ‘कोरडे नक्षत्र’ची नक्कल करत त्याच्या २००० प्रती छापत फसवणूक केली आहे. सदर महिला ही राज्यातील नामवंत साहित्यिकांना सदर प्रती भेट म्हणून पाठवत असल्याचेही होळकर यांनी फिर्यादित नमूद केले आहे. होळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सातपूर पोलिसांनी सविता पन्हाळे या महिलेविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
रात्री अपरात्री फोन करुन त्रास
होळकर यांनी फिर्यादित म्हटले आहे, सदर महिला ही गेल्या काही वर्षांपासून रात्री-अपरात्री फोन करत, एसएमएस पाठवत प्रचंड त्रास देत आहे. शिवाय, माझ्या पत्नीलाही तिने फोनवरून त्रास दिलेला आहे. सदर महिलेविरुद्ध लासलगाव पोलिस ठाणे, एलआयसी कार्यालय, महिला आयोग यांच्याकडेही तक्रारी केल्या आहेत परंतु सदर महिला चौकशीसाठी कुठेही हजर झालेली नाही. आपल्याशी लग्न झाल्याचाही ती बनाव रचत राज्यभर आपली बदनामी करत आहे, असेही होळकरांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे सदर महिलेने काव्यसंग्रहाच्या नकली प्रती छापताना त्यात प्रकाशक म्हणून आईची परवानगी न घेता तिचे नाव टाकत आईचीही फसवणूक केली आहे.

Web Title: Cheating of Prakash Holkar of Lasalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक