भागीदार करण्याचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:05 AM2019-04-30T01:05:20+5:302019-04-30T01:05:48+5:30
नवीन गारगोटी एक्स्पोर्ट कंपनी स्थापन करून भागीदार करण्याचे आमिष दाखवत ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : नवीन गारगोटी एक्स्पोर्ट कंपनी स्थापन करून भागीदार करण्याचे आमिष दाखवत ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळीरोड रामदास स्वामीनगर येथील राजेंद्र जोंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित मनिष देसले, रोहन देसले, वाल्मीक देसले रा. बिटको कॉलेजमागे, नाशिकरोड यांच्याशी घरगुती संबंध असून गेल्या सहा-सात वर्षांपासून ओळख आहे. १ मे २०१६ ते २६ एप्रिल २०१९ च्या दरम्यान जोंधळे हे घरी असताना संशयिताने संगनमत करून त्यांच्या घरी जाऊन विश्वासात घेऊन व्यवसायासाठी आर्थिक मदत म्हणून व नवीन गारगोटी एक्स्पोर्टची कंपनी स्थापन करून भागीदार करण्याचे आमिष दाखविले. राजेंद्र जोंधळे व त्यांच्या पत्नीच्या बॅँकेच्या खात्यावरून वेळोवेळी आरटीजीएस द्वारे ६० लाख रुपये स्वीकारून फसवणूक केली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा युवकांकडून महिलेला मारहाण
मागील भांडणाच्या कुरापतीवरून दोघा युवकांनी महिलेला दगडाने मारहाण करीत तिच्या दुचाकीचीदेखील मोडतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड कॅनलरोड आम्रपाली झोपडपट्टीतील आशा बाळू जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शेजारी राहणारे सचिन जाधव व त्यांचा मुलगा दर्शन जाधव हे घरासमोर आले व मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. तसेच घराबाहेरील दुचाकी हिच्यावर दगडफेक केली. त्याची विचारणा केली असता आशा जाधव यांनादेखील दगड मारून जखमी केले.
तिघा संशयितांकडून मुलाला मारहाण
मोटारसायकलवर बसण्यास नकार दिला याचा राग आल्याने तिघा संशयितांनी अल्पवयीन मुलाला लोखंडी रॉड व धारदार हत्याराने मारून जखमी केले. जेलरोड शिवगंगा अपार्टमेंट येथील हर्ष सुरेश म्हस्के हा जयभवानीरोड भालेराव मळा येथे पायी घरी जात होता. यावेळी संशयित साजन मेहरोलिया, विकी मच्छर, गुड्डू लोहारीया (रा. देवळालीगाव) यांनी हर्ष याला मोटारसायकलवर तुला घरी सोडून देतो, असे सांगितले. मात्र हर्ष याने मोटारसायकलवर बसण्यास नकार दिल्याने त्याचा राग येऊन तिघा संशयितांनी लोखंडी रॉड व धारदार हत्याराने मारून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवे मारण्याचा प्रयत्न
आईच्या एफडीचे पैसे माझ्याकडे दे या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावास मारहाण करून डोक्यात मुसळी मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सिडकोतील पवननगर येथील ज्ञानेश्वर सीताराम राऊत याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास जेलरोड येथील राहुलनगरातील चंद्रलक्ष्मी सोसायटी येथे आईच्या एफडीचे पैसे माझ्याकडे दे या कारणावरून मोठा भाऊ दत्तू सीताराम राऊत याने शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच ज्ञानेश्वरच्या डोक्यात लोखंडी मुसळी मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.