शौचालय बांधण्यासाठी २४१ कुटुंबांना धनादेश
By admin | Published: December 22, 2015 10:17 PM2015-12-22T22:17:02+5:302015-12-22T22:20:57+5:30
स्वच्छ भारत अभियान : केंद्राच्या वतीने अनुदानाचा पहिला हप्ता वितरित
सातपूर : रस्त्याच्या कडेला शौचास बसणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करीत गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरात शौचालय नसणाऱ्या नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या अनुदानाचा पहिला सहा हजार
रुपयांचा (धनादेश) हप्ता २४१ नागरिकांना वाटप करण्यात आला.
या योजने अंतर्गत सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक १६, १७, २० व ५० मधील ज्या नागरिकांच्या घरात शौचालय नाही अशा नागरिकांच्या घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. पात्र नागरिकांचे अहवाल भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २४१ प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने या नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी बारा हजारपैकी सहा हजार रुपयांचा पहिला हप्ता त्या त्या प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते वाटप करण्यात आला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डेकाटे, सुनील बुकाणे, संजय गांगुर्डे व हेमंत अहिरे यांनी शौचालय बांधणेबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रकाश लोंढे व सविता काळे उपस्थित होते. यावेळी अशोक उशिरे, रवींद्र काळे, भगवान काळे, निरंजन काळे उपस्थित होते. (वार्ताहर)